चौपदरीकरणासाठी बांधकामे पाडली, गडब येथे महामार्गालगत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:17 AM2018-10-27T00:17:40+5:302018-10-27T00:17:42+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पेण तालुक्यातील गडब येथील घरे व सार्वजनिक बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पेण तालुक्यातील गडब येथील घरे व सार्वजनिक बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात गडब येथील महामार्गालगतच्या दोन्ही बाजूची बांधकामे येत असून ती संपादित करण्यात आली असल्याने व तशा प्रकारच्या नोटिसा संबंधिताना देण्यात आल्या होत्या. शासनाच्या आदेशाचे पालन करीत येथील नागरिकांनी आपली बांधकामे काढण्यास सुरुवात केली, तर बहुतेक नागरिकांनी ती काढली होती. तर येथील बांधकामावर कारवाई करीत येथील बांधकामे पाडली, या वेळी नागरिकांनी कोणताच विरोध न करता प्रशासनाला सहकार्य केले. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अजय पाटणे, वडखळ पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे आदीसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गडब येथील हनुमान मंदिर, नृसिंहसरस्वती मंदिर, दगडी शाळा, विहिरी या महामार्गात जात असल्याने गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. ज्या घरात आजी, आजोबा, वडील, आई असे सर्व जण राहिलो, माझे बालपण या घरात गेले, ते घर नष्ट होत असताना गहिवरून आले; परंतु शासकीय आदेशाचे पालन करून हे सर्व सहन करायला लागते. ज्या घराच्या ओट्यावर बसून गप्पा रंगायच्या तो ओटा काळाच्या पडद्याआड गेला, बालपणीच्या आठवणी, खेळायचे अंगण, शेजारी विस्थापित झाले. आता फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे नित्यानंद पाटील यांनी सांगितले.
शासनाने गडब येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना मोठी दिरंगाई केली व केवळ सहा महिनेअगोदर मोबदला दिला. एवढ्या कमी कालावधीत येथील घरे खाली करण्यास सांगितले. एवढ्या कमी कालावधीत घरांचे बांधकाम होणे कठीण काम आसताना नागरिकांना भाड्याने जागा घेऊन राहणे हाच पर्याय होता. शेतीच्या कापणीचा हंगाम सुरू असतानाच शासनाने घरे खाली करायला सांगितली. त्यामुळे बाधितांची ताराबंळ उडाली.
>व्यायामशाळा जमीनदोस्त
गडब येथील आदर्श युवा संघटनेची व्यायामशाळाही महामार्गाच्या रुं दीकरणात गेली आहे. याच ठिकाणी सांस्कृतिक, कला, क्र ीडा व सामाजिक कार्याचे नियोजन केले जायचे. शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून व्यायामशाळा बांधून द्यावी, अशी मागणी संघटनेचे संचालक के. पी. पाटील यांनी केली.