मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:20 PM2020-12-17T23:20:36+5:302020-12-17T23:20:40+5:30
पावसामुळे महाड, पोलादपूरमधील माती भरावाच्या कामाला अडचणी
दासगाव : कोरोनामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण बंद होते. पुन्हा काम सुरू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीकडून हे चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. काही दिवसांपासून अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे ठेकेदार कंपनीला माती भरावाच्या कामात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ते काम लवकर काम पूर्ण होईल आणि कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा होती. काम सुरू झाल्यानंतर अनेक अडीअडचणी येऊ लागल्या. जमीन मालकांचे वाद, वन विभागाच्या असलेल्या जमिनी त्यांच्या नाहरकती आणि कोरोनामध्ये बंद झालेले काम यामध्ये बघता बघता दोन वर्षे निघून गेली. कोरोनानंतर काम सुरू झाले. सध्या दुसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये महाडमधील वीर गाव हद्दीपासून ते पोलादपूर भोगाव या ४५ किलोमीटरच्या अंतरापर्यंत एल ॲण्ड टी या ठेकेदार कंपनीने काम घेतले आहे. या परिस्थितीत कंपनीकडून या विभागात अनेक टप्प्यांत मातीचे भराव, खडीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे २०२१ मध्ये या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची आशा आहे.
काम जरी वेगाने सुरू असले तरी आजही या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या भरावाचे कामदेखील आहे. परंतु गेले काही दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे.
माती ओली होत असल्याने मातीच्या खोदकाम आणि भराव यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
ज्या ठिकाणी मातीकाम आहे त्या ठिकाणी या पावसामुळे सध्याच्या परिस्थितीत अडचणी निर्माण होत असल्या तरी ठेकेदार कंपनीकडून लवकरच हा टप्पा पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.