माणगावमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:49 AM2020-11-27T00:49:48+5:302020-11-27T00:50:11+5:30
विविध मागण्यांसाठी आंदोलन
माणगाव : माणगाव तालुका राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी काम बंद करून माणगाव तालुका मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदाेलन केले. या वेळी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, सरचिटणीस तुषार सुर्वे, भारती पाटील, माधुरी उभारे व शेकडाे कर्मचारी उपस्थित हाेते.
या आंदाेलनात प्रामुख्याने सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याचा अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. मुदतपूर्व सेवा निवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा. कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करा. केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करा. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरा व ही पदे भरतानाच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा. वेतन श्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तत्काळ जाहीर करा. महसूल, कृषी, मोटार वाहन इत्यादी विभागांचे सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात यावे. अन्यायकारक शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. दरमहा रुपये ७५०० बेरोजगार भत्ता मंजूर करा व प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा १० किलो अन्नधान्य पुरवठा करा. प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान २०० दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करा. इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करा अशा मागण्यांसंदर्भात हे संपरूपी काम बंद आंदाेलन करण्यात आले.
या संपात माणगाव तालुका राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नाेंदविला, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगड माणगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे यांनी दिली .
नियमांचे केले पालन
n ‘संपात माणगाव तालुका राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या सदस्यांनी कोविड संकटाचे सर्व नियम पाळून म्हणजेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.
nतहसील कार्यालय माणगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग नाेंदविला होता. सरकारी कामकाजावर याचा परिणाम झाला.