कर्जत : शहरातील मुद्रे खुर्दमधील नानामास्तर परिसरात गटारांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. मात्र त्यानंतर महिना उलटूनही गटारांचे काम काही सुरु करत नसल्याने तेथील रहिवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी गटारावर तात्पुरत्या ठेवलेल्या फळ्या वरून डोंबाऱ्यासारखी कसरत करत घर गाठावे लागत आहे. फळी निसटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी काहीच करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या काम रखडण्यामागे लोकप्रतिनिधींमधील वाद हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
नाना मास्तर नगरमधील कीर्ती बिल्डिंग ते विजू तवळे यांच्या दुकानपर्यंत नवीन गटार बांधण्यासाठी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेले आहे. सुमारे सहा ते आठ फूट खोल खड्डे असल्याचे माजी नगरसेवक कृष्णा घाडगे यांनी सांगितले. या खोदलेल्या गटाराच्या दोन्ही बाजूस वसाहती आहेत. महिना उलटूनही काम बंद ठेवल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून खड्ड्यावर फळी टाकून रस्ता रहिवासी ओलांडत आहेत. मात्र हे धोकादायक आहे. फळी निसटल्यास अथवा कोणा महिलेचा, लहान मुलाचा तोल गेल्यास पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून गंभीर इजा होऊ शकते. तरीसुद्धा याबाबत लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, लोकप्रतिनिधिनीच्या आपापसातील वादामुळे काम सुरु केले कि बंद पाडण्यात येते असा आरोप माजी नगरसेवक कृष्णा घाडगे यांनी केला आहे. तरी या संदर्भात पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गटारांचे रखडलेले काम त्वरित सुरु करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली.