इंदापूर-आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:20 AM2020-11-25T01:20:18+5:302020-11-25T01:20:26+5:30
उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : वनक्षेत्र वळतीकरणासंदर्भात मंत्रालयात बैठक
रायगड : जिल्ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गांतर्गत रेवदंडा-इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या रस्त्यांच्या ४२ किमीपैकी ३७ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे अद्ययावतीकरण आणि रुंदीकरणामधील वनक्षेत्र वळतीकरणासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग अद्ययावतीकरण व रुंदीकरण हे काम मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गांतर्गत रेवदंडा- इंदापूर रस्त्यांच्या कामांचे जवळपास ९० टक्के म्हणजे ४२ किमीपैकी ३७ किमी एवढे काम पूर्ण झाले आहे.
बैठकीला वनमंत्री संजय राठोड, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, बांधकाम विभागाचे सचिव अनिल गायकवाड, आ. अनिकेत तटकरे, आ. महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.