‘जलशिवार’चे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2015 12:40 AM2015-08-12T00:40:29+5:302015-08-12T00:40:29+5:30
कर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले.
- विजय मांडे, कर्जत
कर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले. मात्र खोदण्यात आलेल्या नऊ मातीच्या बंधाऱ्यात थेंबभर पाणी साचत नसल्याने कृषी विभागाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.
पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरु वात केली. कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आला. त्यातील टेंबरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावामधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मातीचे बांध आणि लूज बोर्डर खोदण्याचे नियोजन झाले. त्यानुसार आदिवासी वाड्यांच्या परिसरात मातीचे बंधारे खोदले. त्यासाठी जेसीबी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र आदिवासी उपयोजनेमधून तब्बल ४५.९३ लाख रु पये खर्चून बांधलेल्या या मातीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीच साठत नाही.
बंधाऱ्यातील पिचिंगला गळती
जामरुंगमध्ये पाण्यासाठी मातीचे ९ बंधारे खोदण्यात आले. मात्र त्यात पाणीच साठत नसल्याने तब्बल ४५.९३ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्यात पाणी साचत नसले तर उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मातीचे बंधारे बनविण्यासाठी खोदकाम केले. यावेळी पाणी वाहून जाऊ नये म्हणून खाली दगडी पिचिंग करण्यात आले, मात्र तरीही पाणी झिरपत असल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले, हे मान्य करावे लागेल. नऊ बंधारे खोदण्यासाठी अनुक्रमे चार लाखांपासून साडेसहा लाखांपर्यंत खर्च झाला आहे.