कोकण रेल्वेच्या कामात महसूल यंत्रणेला ठेवले वंचित
By admin | Published: March 9, 2017 02:23 AM2017-03-09T02:23:42+5:302017-03-09T02:23:42+5:30
काही महिन्यांपूर्वी रोहा ते वीर डबल ट्रॅक करण्याचे भूमिपूजन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी रोहा ते वीर कोकण रेल्वे डबल ट्रॅकचे काम
- गिरीश गोरेगावकर, माणगाव
काही महिन्यांपूर्वी रोहा ते वीर डबल ट्रॅक करण्याचे भूमिपूजन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी रोहा ते वीर कोकण रेल्वे डबल ट्रॅकचे काम जोमाने व जलद गतीने चालू झाले आहे. मात्र, माणगाव तालुक्यातील महसूल यंत्रणेला या कामाची माहितीच जिल्हाधिकाऱ्यांकडून वा कोकण रेल्वेकडून मिळाली नसल्याचे समजते. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या कंत्राटदारांना रान मोकळे मिळाले आहे. त्याचाच परिणाम नागरिकांस भोगावा लागत
आहे.
गेला महिनाभर माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे कोकण रेल्वेचा रोहा ते वीर डबल ट्रॅकच्या भरावाचे काम सुरू झाले. ते काम फार जलद गतीने चालू आहे. याच्याबद्दल तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्याकडे चौकशी केली असता आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. तसेच कोकण रेल्वेच्या भरावाकरिता माणगाव तहसील कार्यालयात कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
जिल्हा गौण खनिजकर्म अधिकाऱ्यांना या कामाबाबत विचारले असता त्यांनी कोकण रेल्वे उप अभियंता यांना दिलेले पत्र दाखवले. यामध्ये रोहा-वीर या डबल ट्रॅकचे काम मे.एस.आर.सी.कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले असल्याचे दिसले. या कामासाठी लाखो ब्रास माती उत्खनन रॉयल्टीचे पैसे काम पूर्ण झाल्यावर मोजमाप करून कोकण रेल्वे कंत्राटदार यांच्या पैशातून रॉयल्टीचे पैसे कट करून देणार असल्याचे पत्रात सांगितले आहे. म्हणजेच काम झाल्यानंतर कोणते परिमाण वापरून माती मोजण्याचे काम करणार याबाबत संशय निर्माण होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवानगीचे पत्र २० फेब्रुवारीचे आहे, मात्र माती उत्खननाचे काम १ फेब्रुवारीपासून चालू झाले आहे. या कामासाठी होणाऱ्या भरावाबद्दल माणगाव प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात माहिती घेतली असता आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
आणखीन म्हणजे या पत्रात दिलेल्या आटी-शर्तीनुसार काम होत नसल्याचे दिसते. कंत्राटदाराने दिलेल्या जमिनीच्या सर्वे नंबरमध्ये उत्खनन होत नाही तर दुसऱ्याही सर्वे नंबरमधून उत्खनन होत आहे.
तसेच या उत्खननासाठी जे डम्पर नंबर दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन डंपर वापरत असल्याचे दिसते आहे.
डंपरमुळे गोरेगाव बाजारपेठेत वाहतूककोंडी
माती उत्खनन करून गोरेगावच्या बाजारपेठेतून डंपरच्या सारख्या फेऱ्या होत असतात. यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूककोंडी होते. डंपर इतका भरलेला असतो की येथील नागरिकांच्या डोळ्यांत माती उडत असते आणि पोलीस सुद्धा या क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या गाड्यांवर करवाई करीत नाहीत. नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या धुळीवरून डंपरचालक व नागरिकांमध्ये वाद झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच डंपरचालक नागरिकांना दमदाटी करीत धमकावत असल्याची घटना घडली आहे. याबाबत नागरिकही तक्रारी करीत आहेत.
विशेष बाब म्हणजे कंत्राटदार कोकण रेल्वेच्या भरावाच्या नावाने लोणेरे ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी लोणेरे - गोरेगाव मार्गालगत भराव केल्याचे दिसते. त्याची माहिती मंडळ अधिकारी लोणेरे यांच्याकडून घेतली असता त्यासाठी कोणतीही रॉयल्टी घेतली नसल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असल्याने त्याच्या भरावासाठी लागणाऱ्या मातीकरिता रॉयल्टी ही कोकण रेल्वे कंत्राटदारांना अदा करण्यात येणाऱ्या पैशांतून देणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून ९ मार्च रोजी एक कोटी ४० लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे भरणार आहेत.
- रोशन मेश्राम, जिल्हा खनिज गौण अधिकारी, अलिबाग
लोणेरे-गोरेगाव रस्त्यालगत लोणेरे ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी भराव झाले आहेत. मात्र, त्याची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी घेण्यात आली नाही वा कोणताही अर्ज आला नाही.
- योगिता पाटील,
मंडळ अधिकारी लोणेरे