नेरळमधील गर्डर टाकण्याचे काम एक तासात पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:32 AM2017-12-04T00:32:30+5:302017-12-04T00:32:35+5:30
मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे गर्डर आज टाकण्यात आले.
कर्जत : मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे गर्डर आज टाकण्यात आले. मध्य रेल्वेने त्या कामांसाठी अडीच तासांचा पॉवर ब्लॉक घेतला होता. मात्र, अजस्त्र क्रे नमुळे अवघ्या तासात गर्डर टाकण्यात रेल्वे अभियंत्यांना यश आले.
मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात नव्याने पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाचे लोखंडी गर्डर टाकण्यासाठी रविवारी ३ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने पॉवर ब्लॉक घेतला होता. पॉवर ब्लॉकची नियोजित वेळ १०.३० होती; परंतु पुण्याहून मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस उशिरा नेरळ येथून निघाल्याने पॉवर ब्लॉक अर्धा तास उशिरा म्हणजे ११ वाजता घेण्यात आला. त्याआधी मध्य रेल्वेचे मुंबई मंडळ अभियंता आर. के. यादव यांनी गर्डरची, तसेच ते उचलण्यासाठी आणलेल्या क्रे नची पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून पूजा केली. त्या वेळी रेल्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. बरोबर ११ वाजता अजस्र क्रे नच्या साह्याने लोखंडी गर्डर उचलला आणि फक्त पाच मिनिटांनी पुलाच्या खांबांवर ठेवला. त्यानंतर पुढील तिन्ही गर्डर पाऊण तासात टाकून पूर्ण झाले. त्यामुळे एका तासात नेरळ रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर टाकण्यासाठी आणण्यात आलेली अजस्त्र क्रे न २०० टन वजन उचलणारी होती. त्या वेळी या क्रे नमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास १०० टन वजन उचलणारी आणखी एक क्रे न तयार ठेवण्यात आली होती. मात्र, केवळ एका तासाच्या आत चारही गर्डर टाकण्यात मध्य रेल्वेला यश आल्याने अभियंता टीमचे कौतुक करण्यात आले. २१ मीटर लांबीचे चार गर्डर टाकल्याने आता पादचारी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आव्हान मध्य रेल्वे प्रशासनापुढे आहे.