महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम संथगतीने; प्रवासी त्रस्त, गेले काही महिने काम ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:33 AM2021-03-31T01:33:43+5:302021-03-31T01:34:12+5:30
महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.
दासगाव : महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून ये -जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत. (Work on Mahad-Mhapral-Pandharpur road is slow; Travelers suffer, work stalled for the last few months)
म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग १५ महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठीपासून सुरुवात होऊन तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून, हा मार्ग ९६५ डी. डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचेदेखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने या ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे कामदेखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प आहे. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत.
तालुक्यातील शिरगावपासून पुढे सव गावापर्यंत रस्ता काही अंशी बरा आहे मात्र सव गावांपासून पुढे कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न वाहनचालकापुढे पडत आहे. रत्नागीरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सीमेवरील गावांचा अधिक संबंध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्यादेखील या परिसरातून ये-जा करत असतात.
या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, म्हाप्रळ आदी गावे येतात. या परिसरातील नागरिकांचा थेट संबंध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये-जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानकदेखील आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे.