राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: मुंबईगोवा महामार्गावर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्ता बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचता सिमेंट बेस ट्रीटमेंट माध्यमातून दिवसाला पाचशे मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर १२ तासाने वाहतूक सुरू केली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने बनविणारा हा रस्ता वीस वर्ष पर्यंत टिकणार आहे. गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणार असून डिसेंबर पर्यंत दुसरी लेन पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईगोवा महामार्गावर नागोठणे ते पनवेल या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा तिसरा पाहणी दौरा शनिवार पार पडला. नागोठणे चिकणी येथे नव्या अत्याधुनिक पद्धतीने काँक्रिट करणाचे काम कल्याण टोल इन्फ्रास्त्रकचार लिमिटेड या ठेकेदार कंपनी तर्फे सुरू आहे. या कामासाठी इंदोर येथून सिमेंट बेस ट्रीटमेंट अत्याधुनिक मशीनी आणल्या आहेत. यामध्ये ४० टन व्हायब्रेट रोलर, सिमेंट, केमिकल मिक्सर मशीन द्वारे रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा बेस हा उत्तम असला तर रस्ता अधिक काळ टिकतो. यासाठी बेस टिकाऊ करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे.
पर्यावरणाला हानी न पोहचता रस्त्याच्या काँक्रिटकरण काम केले जात आहे. दिवसाला पाचशे मीटर रस्त्याचे काम यंत्रणेमार्फत केले जात आहे. सिमेंट बेस ट्रीटमेंट द्वारे केलेले काम हे बारा तासाचे पक्के होऊन त्यावरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. बेस हा पक्का झाल्याने त्यावर काँक्रिट केले जाणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्ष हा रस्ता सुस्थितीत राहणार आहे. यंत्रणेतर्फे दिवस रात्र काम सुरू आहे. त्यामुळे गणपती पूर्वी एक लेन पूर्ण होणार असून चाकरमानी यांचा खड्याचा त्रास वाचणार आहे.
या पद्धतीने केले जात आहे काम!
दिवसाला पाचशे मीटर काम पूर्ण होत आहे. विर्टगेन या अत्याधुनिक मशीनद्वारे आधी ३०० एम एम रस्ता कट केला जातो. यामध्ये आलेले दगडही क्रश केले जातात. त्यानंतर केमिकल, सिमेंट मिश्रित साहित्य रस्त्यावर पसरले जाते. त्यानंतर रस्त्यावर टाकलेल्या साहित्यावर ४० टन वजनाचा ग्रेडर रोलिंग द्वारे व्हायब्रेट केले जाते. त्यानंतर त्यावर सिमेंटची एक लेअर टाकून बेस पक्का केला जात आहे. पावसाळ्यातही हे काम जोराने सुरू आहे. मात्र मुसळधार पाऊस असल्यास काम थांबवावे लागत आहे. सध्या दोन मशीन द्वारे काम सुरू असून अजून चार मशीन येणार आहेत. त्यामुळे गणपती पूर्वी एक लेन पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
रवींद्र चव्हाण यांचे जातीने लक्ष
मुंबई गोवा महामार्ग हा बारा वर्ष रखडला आहे. नव्याने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी घेतलेले ना. रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. रायगड सह झाराप पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा चव्हाण यांनी कार्यान्वित केली आहे. गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा ना रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा करून जातीने कामाकडे लक्ष देत आहेत.