पाली- खोपोली राज्य महामार्गाचे काम निकृष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:03 AM2020-01-07T00:03:00+5:302020-01-07T00:03:07+5:30
वाकण - पाली - खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम २०१६ पासून सुरू आहे.
विनोद भोईर
पाली : वाकण - पाली - खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम २०१६ पासून सुरू आहे. तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे काम अशा विविध समस्येच्या गर्तेत हा महामार्ग सापडला आहे. त्यामुळे १९८ कोटी रुपयांचा चुराडा होताना दिसत आहे.
या मार्गाचे काम सुरू झाल्यावर वाहनचालक व प्रवाशांना अत्यंत उत्तम दर्जेदार रस्ता मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, यावर पाणी फिरतांना दिसत आहे. सुरुवातीस हा मार्ग बनविण्याचे काम मोनिका कन्ट्रक्शनकडे होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे व ढिसाळ कामामुळे त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. आता नव्याने कंत्राटदाराचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे व ढिसाळ असल्याचे निदर्शनास येत आहे. नव्याने बांधण्यात आलेला काँक्रीटच्या रस्त्याला अक्षरश: भेगा पडल्या आहेत. अर्धवट कामामुळे रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चक्क मातीने बुजविले आहेत. त्यामुळे धुरळ्याच्या त्रास तर होत आहेच. मात्र, वाहने जाऊन खड्ड्यातील माती निघून खड्डेदेखील वाढले आहेत.
याबरोबरच नव्याने तयार केलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला पाणी न मारल्यामुळे रस्त्यांचा दर्जा ढासळत चालला आहे. खड्डे आणि निकृष्ट रस्त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. अशा असंख्य कारणांमुळे या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. ३ वर्षांत अवघे ३९ किमीचे हे काम पूर्ण झाले नाही.
>नियमित या मार्गावरून प्रवास करतो. गरज नसताना ठेकेदाराकडून सगळा रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. अपघातांचा धोकादेखील वाढला आहे. या मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे.
- सचिन जाधव,
पाली-सुधागड
>या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार असल्याचे दिसत आहे. आधीचा डांबरी रस्ता बरा होता, असे म्हणावे लागत आहे. शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, पण रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही.
- रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते,
सुधागड-पाली
>सध्या रस्त्याचे सुरू असलेले काम व त्यामुळे उडत असलेला धुरळा, काही रस्त्यावर पडलेला भेगा व इतर समस्या आम्ही कंत्राटदाराच्या साहाय्याने लवकर दूर करू. या मार्गाचे काम मे ते जूनपर्यंत ८० टक्के पूर्ण होणार आहे. आॅगस्ट, २०२० पर्यंत येथील प्रवाशांना दर्जेदार रस्ता मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत.
- सचिन निफाडे,
उप अभियंता, एमएसआरडीसी
>एकू ण ३९ किलोमीटरचा रस्ता
वाकण-पाली-खोपोली हा राज्यमार्ग क्र. ५४८ (अ) असून, हा मार्ग एकूण ३९ किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याची रुंदी ३० मीटर असून, यामध्ये काँक्रिटीकरण, साइडपट्टी, गटार रस्त्याच्या दुतर्फा झाडे अशा प्रकारचा रस्ता होणार आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग ५४८(अ) रुंदीकरणाचे काम सन २०१६ पासून हाती घेण्यात आले. शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा मार्ग संपूर्णपणे काँक्रिटीचा करण्यात येणार आहे.
>सोयीचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबईवरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. विळेमार्गे पुणे आणि माणगावला येथून जाता येते.