- वैभव गायकर पनवेल : खारघर ग्रामस्थांचे, गावासाठी स्वतंत्र, सुशोभित तलावाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, येथील रघुनाथ विहारशेजारी सिडकोने तलावाच्या कामाला सुरु वात केली आहे.तलावाच्या कामासाठी ग्रामस्थ गेल्या पाच वर्षांपासून सिडकोबरोबर पत्रव्यवहार करीत होते. सेक्टर १३ मध्ये खारघर गावाचा समावेश असून, गाव आणि रघुनाथ विहार सोसायटीलगत हा जुना तलाव होता. मात्र, शहर विकसित करताना सिडकोकडून खोदकामामुळे तलावाचे सपाटीकरण करण्यात आले, तसेच ग्रामस्थांकडूनही दुर्लक्ष झाले. तलावाला लागूनच सिडकोचे मेट्रो स्थानक आहे. या जागेवर सिडको बसआगार किंवा भव्य व्यावसायिक गाळे उभारण्याच्या तयारीत होते. मात्र, गावाची ओळख असलेला आणि आरक्षित असलेला तलाव नष्ट होणार अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली.दरम्यान, ग्रामस्थ, हनुमान ग्रामविकास मंडळ आणि गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन गावासाठी राखीव असलेला तलाव सिडकोने विकसित करावा, असा ठराव ग्रामसभेत मांडला. ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला. या भूमिकेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहमती दर्शविली. ग्रामस्थांनी सिडकोचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन तलावाची मागणी केली. चव्हाण यांनी आश्वासन दिले; परंतु पुढे काहीही झाले नाही. खारघर ग्रामस्थ आणि हनुमान ग्रामविकास मंडळाच्या सदस्यांनी हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदारांनी गावाचा पूर्वीपासून राखीव असलेला तलाव विकसित करून द्यावा, अशी ठोस भूमिका सिडकोत मांडली. अखेर सिडकोने तलाव विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.तलावाच्या कामाला सुरु वात झाली आहे. एक वर्षात तलाव आणि परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असून त्यासाठी दीड कोटीहून अधिक खर्च केला जात आहे.- ए. टी. अनुसे, कार्यकारी अभियंता, सिडकोतलाव सिडकोने राखीव ठेवून विकसित करावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यास ग्रामस्थांची वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यानुसार टेंडर प्रक्रि यादेखील सिडकोने पूर्ण केली असून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वाला येईल.- प्रवीण पाटील, नगरसेवकगावाचा स्वतंत्र तलाव व्हावा, हे ग्रामस्थांचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यामुळे आमचे स्वप्न साकार झाले आहे. याकरिता ग्रामस्थांना सिडकोसोबत संघर्ष करावा लागला. खारघरव्यतिरिक्त इतर गावांनी सिडकोसोबत पाठपुरावा करून आपल्या गावाकरिता स्वतंत्र तलावाचे भूखंड राखीव ठेवावे.- ज्ञानदेव म्हात्रे, ग्रामस्थ, खारघर
खारघरमध्ये तलावाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:26 PM