खोरा बंदरातील वाहनतळाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:34 AM2019-08-20T00:34:39+5:302019-08-20T00:34:46+5:30
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी खोरा बंदराचा नुकताच विकास करण्यात आला.
- संजय करडे
मुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी खोरा बंदराचा नुकताच विकास करण्यात आला. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून खोरा बंदराला दगडाची संरक्षक भिंत उभारण्यात आली. या बंदरातील गाळ काढण्यात आला, त्याचप्रमाणे वाहनतळासाठी जागा वाढवण्यात येऊन त्यावर दगडी अंथरण्यात आली; परंतु यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा ठेके दाराला विसर पडला व काम अर्धवट ठेवून त्याने या कामाकडे दुर्लक्ष केले.
जर ठेके दाराला काम करावयाचे असते तर त्याने हे एप्रिल, मेमध्येच केले असते; परंतु हे काम मागील सहा महिन्यापासून तसेच प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ठेकेदारास बिल अदा करण्यात आले; मात्र तरीही काँक्र ीटीकरणाचे काम अर्धवट ठेवल्याने खोरा बंदरातील वाहनतळाचे काम पूर्ण होणार की नाही हा प्रश्न येथील स्थानिकांकडून उपस्थित के ला जात आहे.
ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी वर्षभरात पाच लाखांच्या आसपास पर्यटक येत असतात, अशावेळी त्यांची चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने लावल्याने वाहतूककोंडी होत असते, आता या पार्किंगचे काम न झाल्यामुळे पर्यटकांची वाहने रस्त्यावर लावावी लागणार आहेत.
महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाने ठेका दिला; परंतु काम पूर्ण न करता बिल अदा करण्याच्या अनोख्या
पद्धतीमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खोरा बंदरात मागील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे झाली आहेत. प्रत्यक्ष पहाता ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येते. ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे व ठेकेदाराच्या सोयीसाठी ही कामे केल्याचे दिसून येत आहे. अनेक कामे अर्धवट असताना सुद्धा ठेकेदाराला बिल अदा केल्याचे दिसून येत आहे. तरी या प्रकरणाबाबत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्जा नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यासाठी मागणी करणार आहे.
- नम्रता कासार, सदस्य, जिल्हा परिषद
खोरा बंदरातील काम हे सोलिंग व्यवस्थित होण्यासाठी एक पावसाळा खाणे आवश्यक होते. पाणी व्यवस्थित जिरल्याने काँक्रीटीकरण मजबूत होणार आहे. यासाठी हे काम मे महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. गणपतीनंतर आम्ही खोरा बंदरातील काँक्रीटीकरण पूर्ण करणार आहोत. संबंधित ठेकेदाराला ५० टक्केपेक्षा कमी बिल अदा करण्यात आले आहे. या कामाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड