साळाव-आगरदांडा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 10:56 PM2020-10-31T22:56:39+5:302020-10-31T22:58:25+5:30
Salav-Agardanda road : साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सात कोटींचे काम मंजूर करण्यात आले होते.
मुरुड : तालुक्यातील मुंबईला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याचे काम अद्यापर्यंत अर्धवट स्थितीती राहिल्याने नागरिकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला असून, तसे संकेत मिळत आहेत. नोव्हेंबरमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे, तातडीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे बांधकाम खात्याकडून स्पष्ट झाले आहे.
साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सात कोटींचे काम मंजूर करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता साळावपासून सुरुवात करून बारशीव हद्दीपर्यंत आणला आहे, नंतर हे काम बंद केल्याने मुरुड ते बारशीवच्या अलीकडील रस्ता तसाच ठेवल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यामधून प्रवास करावा लागत आहे.
मुरुड तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले असून, या रस्त्यांचा पर्यटक, ऑटो रिक्षाचालक व दुचाकीस्वार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एवढे सर्व घडत असताना, मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे जनतेला रस्त्यांबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती, त्यामुळे हा रस्ता कधी होणार, हा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना सतावत होता. या संदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत कार्यकारी अभियंता यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती, तसेच या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते.सार्वजनिक बांधकाम खाते आता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याप्रमाणे, तातडीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे बांधकाम खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. साळावपासून जो रस्ता तयार केला, तो बारशीव चढणीपर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक जनता त्रस्त झाली होती.