पेण : काळेश्री बंदरापासून कान्होबा, तुकाराम वाडी कोळीवाडा येथून प्रारंभ होऊन भाल विठ्ठलवाडीपासून धरमतर खाडीचा सात किलोमीटर किनारा संरक्षक बंधारा पार करीत तामसीबंदर, घोडाबंदर वळसा घालीत बहिराम कोटक ते वासखांड असा बंधारा बांधण्यात येत आहे. वाशी ग्रामपंचायत हद्दीतील १६.४४ किलोमीटर लांबीची नारवेल बेनवले खारभूमी योजनेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. योजनेतील साईटवरील कामाचा पाहणीदौरा नुकताच संबंधित पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसह दिवसभरात १० तास करून योजनेतील काम व केलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. मातीचा बंधारा बांधण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर योजनेतील नऊ उघाडीपैकी विठ्ठलवाडी, तुकाराम वाडी, घोडा बंदर या तीन ठिकाणी काम सुरू आहे. १३६६ हेक्टर शेतजमीन संरक्षण व संजीवनी देणाऱ्या या योजनेला जागतिक बँकचे अर्थसहाय्य लाभल्याने योजनेच्या कामाची गुणवत्ता व दर्जा परीक्षणाची काटेकोर अंमलबजावणी साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. तर योजनेतील पर्यवेक्षण व देखरेख खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण यांच्याकडे असल्याने शेती व शेतकरी यांच्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पूर्ण होते नितांत गरजेचे आहे. २०२१ वर्षारंभी या योजनेला मुहूर्त मिळाला. त्यानंतर जानेवारीअखेरीस योजनेतील कामाचा पसारा पाहून पाच टप्प्यांत नियोजनबध्द काम सुरू झाले. काळेश्री, विठ्ठलवाडी, मोठे भाल तामसीबंदर घोडा बंदर, बहिराम कोटक , वासखांड या ठिकाणी साइट सुरू झाल्या. त्या ठिकाणी १५० ते १६० कामगार, १० इंजिनिअरपैकी ७ ठेकेदार कंपनीचे तर ३ खारभूमी विभागातील, यंत्र सामग्रीमधे १०० ट्रॅक्टर ,१२ पोकलेन, ७ जेसीबी ही मातीकाम उपसून बंधारा रचणारी सामग्री तर खाणीतून पिंचीगसाठी दगडाची वाहतूक करणारे डम्पर अशाप्रकारचे योजनेतील पाच ग्रामपंचायतीच्या १३ गावांचे परिसरात काम सुरू आहे. माती कामापैकी ७० टक्के काम तर योजनेतील सर्वसमावेशक असे ३० ते ३५ टक्के काम करण्यात प्रथमेश काकडे कनटक्शन ठेकेदार कंपनीच्या अभियंत्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीमुळे पाण्याची पातळी संरक्षक बंधाऱ्यांना स्पर्श करीत असल्याने माती ओली होऊन बंधाऱ्याचे काही ठिकाणी खोली ४० ते ४२ फूट असल्याने मातीकाम ढासळते, अशा २००० मीटर लांबीच्या ठिकाणी ५० मीटरवर एक याप्रमाणे दगडांचे बांध खाडीत टाकण्याचे नियोजन अभियंते करीत आहेत.स्थानिक शेतकरीवर्गाचा अनुभव, सल्ला व मार्गदर्शन घेतले जाऊन त्यानुसार काम प्रगती व गतीने सुरू आहे. कामाची मुदत १८ महिने मे २०२२ पर्यंत आहे. योजनेतील उघाडीच्या कामाचे आव्हान हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह सतत सुरु राहतो. अशा परिस्थितीत आरसीसी सिमेंट काँक्रीटचे काम भरती ओहोटी, उधाण भरतीमुळे होणारा विळंब या साऱ्या परिस्थितीवर मात करीत या खारभूमी योजनेचे काम साकारत आहे. लढावंच्या सरपंच पूजा अशोक पाटील, दिव सरपंच विवेक सदानंद म्हात्रे, बोर्झे सरपंच वृषाली विष्णू ठाकूर, वढाव उपसरपंच ओमकार म्हात्रे, दिव उपसरपंच सदानंद म्हात्रे, बोर्झे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संभाजी पाटील, विजय ठाकूर, अशोक पाटील, विष्णू ठाकूर या व इतर दहा जणांच्या शिष्टमंडळाने १७ किलोमीटर लांबीच्या कामाची पाहणी केली.योजनेत २८ घरे बाधित या योजनेमध्ये बाधित २८ घरांचा समावेश असून २४ घरमालकांची संमती मिळाली आहे. या घरांना सरकारी मूल्यांकनानुसार किंमत देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी स्थानिक सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्यानुसार मदत केली जाईल. एकंदर एवढ्या मोठ्या योजनेतील यांत्रिक साधनसामग्री घेऊन धावणारी वाहने यासाठी बहिराम कोटक बंदरावर जाणारा ७०० मीटरचा रस्ता ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून केल्याने हा जोडरस्ता स्थानिकांना वाहतुकीसाठी सोयीचा ठरला आहे.
खारभूमी योजनेचे काम शेतीसाठी संजीवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 1:05 AM