नेरळमधील शाळा इमारतीचे काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:53 AM2019-09-19T00:53:31+5:302019-09-19T00:53:39+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेली नेरळ वाल्मिकीनगर प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे.
- कांता हाबळे
नेरळ : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेली नेरळ वाल्मिकीनगर प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली होती; परंतु इमारतीचे काम ठप्प असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली असून शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ गावात वाल्मीकीनगर भागात असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्व ९६ विद्यार्थी दोन खोल्यांमध्ये कोंबून बसविले जात आहेत. त्यामुळे सर्वशिक्षा अभियानामधून एक वर्गखोली मंजूर करण्यात आली होती. मात्र, तेथील आदिवासी जमिनीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर कर्जत
पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानाने नेमलेल्या ठेकेदाराने
एप्रिल महिन्यात वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने पावसाळा सुरू होईपर्यंत वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण केले
नाही.
त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात देखील वाल्मीकीनगर शाळेतील विद्यार्थी हे दाटीवाटीमध्ये बसून शिक्षण घेत आहेत.दोन वर्गखोलीत असंख्य विद्यार्थी बसत असून त्यांना शिक्षण कसे द्यायचे हा देखील प्रश्न त्या शाळेतील शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.
त्यामुळे शाळेच्या वर्गखोलीचे काम अडविणाऱ्या ठेकेदारांच्या कामाचा ठेका रद्द करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वर्गखोली बांधण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून मागील दोन महिने तर कामे पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे पालक वर्ग नाराज आहेत.
या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्याबाबत कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण आणि सर्वशिक्षा अभियान यांना कळविणे गरजेचे आहे.
>विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता
ठेकेदाराने अर्धवट काम केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे. कारण इमारतीचे बांधकाम साहित्य शाळेच्या आवारात अस्ताव्यस्त पडले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापतदेखील होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सुरुवातीला वादळी वाºयाने सुलभ स्वच्छतागृहाची पत्रे उडून बाजूच्या घराजवळ पडली होती, त्या वेळी मोठा अपघात होताना वाचला होता.
>पालकांचा आंदोलनाचा इशारा
आम्ही सुरुवातीला शाळेच्या इमारतीला विरोध केला होता, कारण शाळेचे काम सुरू झाल्यानंतर रेंगाळणार याची आम्हाला खात्री होती. आता आम्ही पालकवर्ग शांत असून दिवाळीपूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तर मात्र इमारत पूर्ण होण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व पालक प्रकाश वाघ यांनी दिला आहे.
>कामाची गती अत्यंत धिमी असल्याने आम्ही स्थानिक रहिवासी त्रस्त झालो असून कामाकडे लक्ष नसलेला ठेकेदार बदलून अन्य कोणास काम द्यावे अशी आम्ही सर्व ग्रामस्थ तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना अर्जाद्वारे मागणी करणार आहोत.
- राहुल मुकणे,
स्थानिक रहिवासी
>आमच्या घराच्या बाजूला शाळेच्या वर्गखोल्या आहेत,त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी टाकलेले साहित्य आमच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्या साहित्यामुळे आमच्या घरातील व अन्य भागातील मुलांना देखील खेळायला जागा शिल्लक नाही.
- संतोष भोईर, पालक