वावोशी : खालापूर तालुक्यातील भूषण स्टील व्यवस्थापनाने कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील सुमारे ४०० ते ६०० कामगारांनी काम बंद आंदोलन करून व्यवस्थापनाचा निषेध केला. जोपर्यंत निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील, असा पवित्रा घेतल्यामुळे कंपनी प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. भूषण स्टील कारखान्यात सुमारे तीन हजार कामगार ठेकेदारी पद्धतीवर काम करीत आहेत. या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनाला दिले आहे. यात वेतनवाढ, बोनस व इतर बाबींचा समावेश आहे. काही महिन्यांपासून याच कारणास्तव व्यवस्थापन व कामगारांत शीतयुद्ध सुरू आहे. शुक्रवारी सकाळी प्रवेशद्वारावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सुनील देसले व इतर कामगारांना निलंबित केल्याचे पत्र लावण्यात येऊन त्यांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कामावर असणाऱ्या पहिल्या पाळीतील सुमारे ४०० ते ६०० कामगारांनी काम बंद करून तहसीलदारांकडे जाऊन निवेदन दिले.कामगारांच्या या पवित्र्यामुळे कंपनीतील स्टील उत्पादनावर परिणाम आला. सायंकाळपर्यंत तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार उत्तम कुंभार, शशिकांत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी ब. द. कल्लूस्कर व कामगार प्रतिनिधी यांच्यासमवेत झालेल्या घटनेसंबंधी चर्चा सुरू होती.
खालापूर कारखान्यात काम बंद
By admin | Published: July 10, 2015 9:56 PM