कर्जतमध्ये आमदारांनी पाडले काम बंद
By admin | Published: April 23, 2016 02:07 AM2016-04-23T02:07:48+5:302016-04-23T02:07:48+5:30
चौक-कर्जत रस्त्याचे काम झाले असून आता रस्ता सुस्थितीत आहे मात्र रिलायन्स कंपनीने या रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून त्या ठिकाणी फोर जी केबल टाकत आहे
कर्जत : चौक-कर्जत रस्त्याचे काम झाले असून आता रस्ता सुस्थितीत आहे मात्र रिलायन्स कंपनीने या रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून त्या ठिकाणी फोर जी केबल टाकत आहे. या साइडपट्ट्या खोदल्याने पावसाळ्यात हा रस्ता खराब होईल असे आमदार सुरेश लाड यांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांनी हे काम बंद पाडले आहे.
चौक फाटा ते कर्जत चार फाटा हा रस्ता अत्यंत खराब होता. आमदार सुरेश लाड यांनी प्रयत्न करून हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून बनवून घेतला. सध्या हा रस्ता सुस्थितीत आहे, मात्र रिलायन्स कंपनी या रस्त्याची साइडपट्टी खोदून यामधून फोर जी केबल टाकत आहे हे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आमदार सुरेश लाड याच रस्त्याने जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी हे काम त्वरित बंद करा असे त्या कामगारांना सांगितले. हे काम चालू असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी उभा नव्हता. विशेष म्हणजे १९ तारखेला महावीर जयंतीची सुटी होती आणि त्याच दिवशी हे काम सुरु होते. साइडपट्ट्याखोदून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे काम चालू आहे. पावसाळ्यात यामध्ये पाणी शिरून हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे असे लाड यांचे म्हणणे आहे. तुमच्या केबल टाकण्याला माझा विरोध नाही मात्र रस्त्यापासून काही फुटाचे अंतर सोडून तुम्ही काम करा जेणेकरून रस्त्याला काही बाधा येणार नाही असे सांगितले. याबाबत आमदार सुरेश लाड यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी मोबाइलवर संपर्कसाधला असता त्वरित काम बंद करतो असे सांगितले. याबाबत त्यांचा सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता सत्यनारायण कांबळे यांच्याशी संपर्कहोऊ शकला नाही.