माणगावमध्ये नाट्यगृहाचे काम सुरू; चार कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:45 PM2020-02-06T22:45:08+5:302020-02-06T22:45:12+5:30

शहराच्या वैभवात भर पडणार

Work on the theater started in Mangaon; Four crore funds sanctioned | माणगावमध्ये नाट्यगृहाचे काम सुरू; चार कोटींचा निधी मंजूर

माणगावमध्ये नाट्यगृहाचे काम सुरू; चार कोटींचा निधी मंजूर

Next

- गिरीश गोरेगावकर 

माणगाव : येथे नाट्यगृहासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, या नाट्यगृहाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. हे नाट्यगृह माणगाव शहराच्या वैभवात भर टाकणारे असून, त्याचे बांधकाम शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेल्या शासकीय जागेत होत आहे.

माजी आ. अशोक साबळे यांनी माणगावात नाट्यगृह व्हावे, अशी मागणी खा. सुनील तटकरे यांच्याकडे त्या वेळी केली होती. मात्र, शासनाच्या नियमानुसार त्या वेळेच्या ग्रामपंचायतीला निधी देता येत नव्हता. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देऊन त्यांनी पाठपुरावा केला होता. योगायोगाने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने या नाट्यगृहाच्या मंजुरीसाठी गती मिळाली. दोन वर्षांपूर्वीच आराखडा तयार करून प्रस्ताव देण्यात आला. खा. तटकरे यांनी यासाठी पाठपुरावा करून चार कोटींचा निधी मंजूर करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

भूमिपूजन झाल्यानंतर शासनाने निविदा काढून चार कोटींचा निधी माणगाव नगरपंचायतीकडे वर्ग केला आहे. माणगाव शहरात सांस्कृतिक व नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने सुरू होऊन रसिकांना नाटक पाहण्याची संधी मिळणार आहे.नाट्यगृह किंवा सिनेमागृह तसेच मोठे सभागृह नसल्याने सर्व कार्यक्रम अशोक साबळे विद्यालयाच्या भव्य प्रांगणात खुल्या वातावरणात होत असत, त्यामुळे रसिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी नाट्यसंस्था व कलाकारांनी नाट्यगृहासाठी आग्रह धरला होता. त्यांचे हे स्वप्न दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.

दक्षिण रायगडमधील माणगाव शहरासारख्या मध्यवर्ती ठिकाणी नाट्यगृह उभारले जात असून, नाट्यरसिकांसाठी समाधानाची बाब आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, लघुचित्रपटातून माणगाव तालुक्यातील अनेक कलाकार भूमिका करत आहेत. त्यामुळे नाट्यगृहाची उपलब्धता होत असल्याने स्थानिक कलाकारांना संधी मिळेलच; शिवाय दर्जेदार व्यावसायिक नाटकांची पर्वणी माणगावकरांना मिळेल.
- रामजी कदम, नाट्यप्रेमी, माणगाव

माणगावात नाट्यगृहाचे काम सुरू झाले आहे. लवकरच हे काम पूर्ण करून नगरपंचायतीमार्फत हे नाट्यगृह नाट्यरसिकांसाठी खुले केले जाईल. साधारण ५०० नाट्यप्रेमी बसतील एवढी आसन व्यवस्था असेल. खासदार सुनील तटकरे यांनी या नाट्यगृहासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीची कमतरता भासल्यास अजून निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
- योगिता चव्हाण, नगराध्यक्षा, नगरपंचायत, माणगाव

नगरपंचायतीकडे जबाबदारी

हे नाट्यगृह सर्वांसाठी खुले होणार असून, त्यामध्ये सर्व प्रकारचे खेळ, मंगलमय सोहळे, सर्व प्रकारच्या सभा, बैठका, वाहनतळ, उद्यान, लहान सिनेमागृह आदी सर्व सुविधांयुक्त होणार आहे. या नाट्यगृहाची जबाबदारी नगरपंचायतीकडे असल्याने त्यांना देखभाल व दुरुस्ती करता येणार आहे. या नाट्यगृहाचे उत्पन्न नगरपंचायतीला मिळणार असून, त्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ होणार असल्याने अतिरिक्त वाढलेला निधी माणगाव शहराच्या विकासासाठी वापरता येणे शक्य होणार आहे.नाट्यगृहाबरोबर नाना-नानी पार्कचे भूमिपूजन झाले होते. मात्र, त्या जमिनीचा वाद न्यायालयात गेल्याने या पार्कचे काम थांबलेले आहे.

Web Title: Work on the theater started in Mangaon; Four crore funds sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.