पाणी योजनेचे काम संथ गतीने

By admin | Published: November 23, 2015 01:28 AM2015-11-23T01:28:18+5:302015-11-23T01:28:18+5:30

खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात

The work of the water scheme is slow | पाणी योजनेचे काम संथ गतीने

पाणी योजनेचे काम संथ गतीने

Next

अमोल पाटील, खालापूर
खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने खोपोलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेली जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ३५ कोटी रूपयांवर गेली आहे. आणखी किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी ही योजना पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे खोपोलीकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
खोपोली नगरपालिकेने शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन २००८ मध्ये जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते. ही योजना अस्तित्वात आल्यानंतर वीणानगर, अशियाना इस्टेट, काटरंग, मोगलवाडी, भानवज, वर्धमान नगर, साईबाबा नगर, शिळफाटा, हाळ, ताकई, यशवंत नगर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार होता. शहरातील अन्य भागातही या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार होता. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेल्या या योजनेचे काम सुरू झाले. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. काम रखडल्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी सध्या ३५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
खोपोली शहरात अनेक भागांमध्ये पाणीच येत नसल्याने पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ४० टँकर वापरले जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती रमेश जाधव यांनी दिली आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिनी टाकल्यानंतर अन्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी आणखी किमान चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पालिकेकडून मात्र हे काम लवकर होईल असे सांगितले जात आहे.

Web Title: The work of the water scheme is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.