रोह्यात जलयुक्त शिवारांची कामे रखडली
By admin | Published: June 15, 2017 02:57 AM2017-06-15T02:57:07+5:302017-06-15T02:57:07+5:30
रोहा तालुक्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण ९३ कामांना मंजुरी मिळाली आहे; परंतु जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कामांना
- मिलिंद अष्टिवकर। लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : रोहा तालुक्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण ९३ कामांना मंजुरी मिळाली आहे; परंतु जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कामांना प्रशासकीय मान्यता पावसाच्या तोंडावर मिळाल्याने त्यातील बहुतांश कामे रखडली आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार असून, शासनाच्या हलगर्जीबद्दल शेतकरी संतप्त असल्याची प्रतिक्रि या शेतकरी संघटनेचे दशरथ साळवी यांनी दिली आहे.
‘जलयुक्त शिवार’ म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने डिसेंबर २०१४मध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू केली. नाले, खोलीकरण, रुंदीकरण, पाझरतलाव, लघुसिंचन करणे, पिण्याच्या पाण्याचा स्रोत बळकट करणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, शेतीसाठी पाणी संरक्षित करणे, वळणबंधारा बांधणे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, सलग समतल चर आदी कामे दुष्काळमुक्त करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. २०१६-१७करिता २५ कोटी ८ लाख ८४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक रोहा कृषी खात्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले होते. त्यापैकी १९ कोटी ४ लाख ८४ हजार रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
यावर्षी रोहे तालुक्यातील पाटणसई, वाली, भालगांव, खांबेरे, टेमघर या चार गावांची निवड करण्यात आली आहे. चार गावांतील एकूण ९३ कामांकरिता १९ कोटी ४ लाख ८४ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाटणसई येथील सिमेंटनाला बांध, वळण बंधारा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत गाव तलावातील गाळ काढणे, वनविभागातील सिमेंट नाला बांध ही कामे होणे शक्य नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. या विभागातील ५२ कामांपैकी २४ कामे रद्द झाली आहेत. इतर हक्कात वने आल्यामुळे त्यातील सलग समतल चर व अनगड दगडी बांध अशी १६ कामे रद्द करण्यात आली आहेत. तसेच संयुक्त जमीन मालकांपैकी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने एक सिमेंट नाला बांध हे काम रद्द करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारांना दर परवडत नसल्याने या भागातील सर्वच्या सर्व अर्थातच ८ शेततळ्यांचे काम रखडणार आहे. या कामासाठी केवळ ५० हजार अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
वाली गावात सिमेंट नाला बांध व वळण बांध या कामांकरिता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर कामांना मान्यता मिळाल्यामुळे सदरची कामे रखडणार आहेत. सलग समतल चरातील ८ पैकी ६ कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. लूझ बोल्डर यातील ९ पैकी ५ कामे पूर्ण झाली, तर ४ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
भालगाव येथील मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध व वळण बंधारा या कामांना प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाल्यामुळे पावसाळ्यात काम होणे अवघड आहे. तसेच सीसीटीची १० कामे पूर्ण, तर ५ कामे निविदा प्रकियेमध्ये असून ती कामेदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. खांबेरे टेमघर येथेदेखील परिस्थिती जैसे थे आहे. मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध व वळण बंधारा या महत्त्वाच्या कामांना उशिरा प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे सदरची कामे रखडणार आहेत. सीसीटी यातील १२ पैकी ६ पूर्ण तर ६ कामे ठेकेदार करीत नसल्याची बाब समोर येत आहे. एकंदरित जिल्हा प्रशासनाकडून पावसाळ्याच्या तोंडावर या लाखमोलाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ही कामे रखडली आहेत. शेतकरी वर्गाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.