कर्जतमधील दहा गावांत जलयुक्त शिवारमधून कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:17 AM2019-06-19T00:17:59+5:302019-06-19T00:18:12+5:30
पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात अपयश; अभियानांतर्गत रोजगार मिळण्याची संधी
कर्जत : तालुक्यातील आठ गावांत जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे.
गतवर्षी आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर कर्जत तालुक्यात खर्च करू नये, अशी सूचना केली होती. तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार बिनकामाचे ठरत असून केवळ शेतदुरुस्ती, बांधबंदिस्ती आणि गाळ काढण्याची कामे केली जात
आहेत.
२०१९ या वर्षात कर्जत तालुक्यातील ज्या दहा गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले, तेथे अभियानांतर्गत जुनी शेतदुरुस्ती, नवीन शेत तयार करणे आणि तलावातील गाळ काढणे याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे समाविष्ट केली गेली नाहीत. यंदा बळीवारे, नांदगाव, खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, जुम्मापट्टी, चाफेवाडी, माणगाव या नऊ गावांत केवळ दुरुस्तीची कामे केली गेली आहेत. जुनी शेतदुरुस्ती करून अभियानातून अनेकांना रोजगार मिळावा, असे निर्देश आहेत; परंतु बहुतेक ठिकाणी ट्रॅक्टर ऐवजी जेसीबी मशिन लावून नवीन शेते तयार केली आहेत. भडवळ येथील एकमेव सिमेंट बंधारा अभियानात समाविष्ट आहे.
खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, बळीवारे, नांदगाव अशा तालुक्यांच्या टोकावर असलेल्या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविताना सर्रास जेसीबी मशिन लावून शेतदुरुस्ती आणि नवीन शेत पाडण्याचे काम केले गेले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना जमिनीची भूजल क्षमता वाढवून जुन्या पाणवठ्यांना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि तेथे उभ्या असलेल्या झाडांना पाणी मिळावे म्हणून पाणी अडविण्याचे काम केले जाऊ शकते.