पेण : वाशीनाका येथे मार्गिका मिळावी तसेच डोलवी गाव, बोरीफाटा येथे मार्गिका मागणीसाठी केलेल्या शेकापच्या काम बंद आंदोलनामुळे गेले पाच ते सहा दिवस मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला ब्रेक मिळाला होता. या संदर्भात थेट सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी पत्राद्वारे आंदोलनाकर्ते आ. धैर्यशील पाटील यांना कळविल्याने महामार्गावरील वाशीनाका, बोरीफाटा, डोलवी गाव, साइट वगळून इतर दहा ते बारा ठिकाणचे बंद पडलेले काम ठेकेदार कंपनीने सुरू केले. या प्रकरणी असलेला तणाव निवळल्याचे चित्र शुक्रवारी महामार्गावर पाहावयास मिळाले आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम थेट कर्नाळा अभयारण्य ते पेण वडखळ या तब्बल ३५ कि.मी. टप्प्यात वेगाने सुरू आहे. या गतिमान कामात महामार्ग प्राधिकरण यंत्रणेने अनेक त्रुटी उणिवा ठेवल्याने या महामागावरून नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे या रुंदीकरणाचे कामकाज उरकण्याची डेटलाइन वारंवार पुढे ढकलल्याने आणि स्थानिकांचे दळणवळणाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने या समस्यांचा सामना ठेकेदार कंपनीला करावा लागत होता. वाशीनाका काम बंद आंदोलकांनी सामंजस्याने मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे धैर्यशील पाटील यांनी सांगितले. विकासकामाला विरोध नको या भावनेतून २२ जानेवारीपर्यंत वाशीनाका, बोरीफाटा व डोलवी गाव याच साइटवरील काम बंद ठेवले आहे. उर्वरित महामार्गावर सुरू असलेल्या सर्व साइटचे काम करण्यास कोणतीच हरकत नसल्याने ठेकेदार कंपनीची यंत्रसामग्रीसह महामार्ग रुंदीकरणाचे कामकाज सुरू केले आहे.