मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम बंद, शेकापचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:29 AM2019-01-08T02:29:26+5:302019-01-08T02:29:50+5:30
शेकापचा ठिय्या : वाशीनाका येथे उड्डाणपूल अथवा मार्गिका मिळण्याची मागणी
पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशीनाका, बोरी, डोलवी या गावांना महामार्ग जवळ आहे. त्याच पद्धतीने वहिवाटीचा पूर्वापार चालत आलेलाच मार्ग मिळावा, यासाठी शेकाप पेण तालुका संघटना आणि वाशी, डोलवी, मसद, शिर्की, बोरी या खारेपाटातील ग्रामपंचायती सरपंच, शेकाप कार्यकर्ते यांनी सोमवारी महामार्गावरील खासर खिंड ते डोलवी या आठ किमी पट्ट्यातील महामार्ग रुंदीकरणाचे काम बंद करून शासनाला अलर्ट दिला आहे. वाशीनाका येथे उड्डाणपूल अथवा मार्गिका मिळावी या मागणीसाठी न्याय मिळेपर्यंत काम बंद आंदोलन बेमुदत करण्याचा निर्धार त्यांनी के ला.
आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रमोद पाटील, नीलिमा पाटील, डी. बी. पाटील यांच्यासह वाशी, कणे, बोर्झे, काळेश्री, दिव, वढाव येथील सरपंच या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. वाशी नाका या ठिकाणी महामार्गावरच शेकाप कार्यकर्ते शांततेने सकाळी ११ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलनासाठी उतरले, मात्र महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीने या आंदोलनाची दखल घेत काम करणारी साधनसामग्री एक दिवस अगोदरच साईटवरून हलविली होती. पेण शहरालगत पुलाचे तर रामवाडी, खाचरखिंड, वाशीनाका मळेघर, कांदळे, कांदळेपाडा ते डोलवी या ठिकाणी ज्या साईटवर महामार्गाचे काम सुरू होते ते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीने बंद केले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी वाशीनाका येथेच महामार्गावर ठिय्या आंदोलन के ले.
राज्य व केंद्र शासनाला, या रुंदीकरणाच्या कामाशी संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारांना काम करू न देण्याचा निर्धार सोमवारी धैर्यशील पाटील यांनी जाहीर के ला. तर रस्त्यावरच ठिय्या मारून दररोज पहारेकरी बनून काम बंद ठेवण्याचा निर्णय शेकापच्या आंदोलकांनी घेतला. तसेच मंगळवारपासून प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच व गावकरी रस्त्यावर उपस्थित राहून हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेवून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी अग्रवाल, पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आ. धैर्यशील पाटील यांच्याशी या समस्येबाबत चर्चा केली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने अधिकाºयांनी काढता पाय घेतला. जोपर्यंत महामार्गावर जोडरस्ते होत नाहीत तोपर्यंत आंदोलनाची धग कायम राहणार असल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये शेकाप पेण तालुका चिटणीस दिनेश पाटील यांच्यासह ज्येष्ठ मंडळीही रस्त्यावर उतरली. ग्रा. पं.चे सरपंच, सदस्य, विभागीय पदाधिकारी उपस्थित होते. डोलवी ग्रामपंचायतीच्या काँग्रेस पक्षाच्या सरपंचासह गावकरी मंडळींनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
मार्गिकेचा संकल्प आराखड्यात समावेश नाही
च्केंद्र शासनाच्या महामार्ग विभागीय अधिकारी वर्गाने चौपदरीकरणाचा संकल्प चित्र आराखडा बनविताना महामार्गाला जोडलेले जे ग्रामीण रस्ते आहेत, त्यांना मार्गिका या संकल्प आराखड्यात न दाखविल्याने भविष्यात मोठी कोंडी होणार आहे. या समस्येची पूर्वकल्पना देत गतवर्षीच मे २०१८ मध्ये या संदर्भात मोठे आंदोलन शेकाप आ. धैर्यशील पाटील यांनी केले होते. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांंधकाम मंत्री नितीन गडकरी यांना या समस्येबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली होती तसे शेकाप आ. धैर्यशील पाटील यांना कळविण्यात आले होते. मात्र आता या रुंदीकरणाचे काम होत असताना या मार्गाचा लवलेशही संकल्प चित्र आराखड्यात नसल्याने विभागीय ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा भावनेने रस्त्यावर उतरले आहेत.