कामशेत : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड-विसापूर किल्ल्यांवर गेली १९ वर्षे दुर्गसंवर्धनाचे काम सुरू आहे. गडावर दुर्गसंवर्धन कार्य सुरू असताना व दुर्गभ्रमंती करीत असताना कार्यकर्त्यांना तोफगोळा दिसला.
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी विसापूरवरील शिवमंदिरात मंचातर्फे दीपोत्सव करण्यात आला. शिवमंदिर परिसरात दिवे व रांगोळ्या काढण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर कार्यकर्ते गडभ्रमंती करीत असताना दारूगोळा कोठारासमोर कार्यकर्त्यांना एक तोफगोळा जमिनीतून वर आलेला दिसला. हा तोफगोळा बाहेर काढल्यानंतर अन्य ठिकाणी शोधले असता अजून एक तोफगोळा कार्यकर्त्यांना सापडला. दोन तोफगोळे सापडल्याचे पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते. ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या वर्षी मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन करण्याची पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. याची खंत सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली. आता तरी पुरातत्त्व विभागाने येथे उत्खनन करावे, अशी मागणी टेकवडे यांनी केली आहे.गडावर सापडलेले तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून त्यात तोफेत दारू भरून नंतर वातीद्वारे हे उडवले जातात, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी दिली. या तोफगोळ्यांचे वजन पाच ते दहा किलो आहे. या प्रसंगी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, सचिव सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, अमोल गोरे, मनीष मल आदी उपस्थित होते. तर, शिवमंदिरातील दीपोत्सवाची तयारी सागर कुंभार व मनीष मल यांनी केली. सचिन निंबाळकर यांनी अभिषेक केला.