अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष तीन दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर बहुतांश नागरिकांकडून कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती जास्त वाटत असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. मार्च महिन्यात कोरोना झालेल्या रुग्णांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यात लॉकडाऊन होत असल्याने पनवेलकरांमध्ये धाकधूक वाढली आहे. गेल्या २४ दिवसात ३ हजार ५६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गत वर्षीच्या प्रमाणात यावर्षी झपाट्याने वाढ होत आहे. अशीच वाढती संख्या असेल तर लॉकडाऊन नक्की लागेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. पुन्हा हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, हॉटेल व्यावसायिक, विविध आस्थापनातील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारी कामगार, नोकरदारवर्ग लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. कोरोना झालेला बरा, पण लॉकडाऊन नको, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. कित्येकांच्या नोकऱ्या या लॉकडाऊनमुळे हिरावल्या गेल्या आहेत. आता परत मागील दिवस नकोत, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे.
गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. येत्या चार दिवसात होळी आली आहे. सणाला जातोय, असे सांगतात. पण आतून लॉकडाऊनची भीती कायम घर करुन आहे. आता तरी आपण मुंबईत अडकून राहू नये, याकरिता येथून काढता पाय घेतला जात आहे. बिगारी कामगार, रोजंदारीवरील कामगार, गरीब मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे वाटचाल करत आहेत.
दररोज बिगारी काम करुन माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. गतवर्षी लॉकडाऊन काळात पायीच गाव गाठले होते. टाळेबंदीनंतर कामाला सुरुवात झाली म्हणून मी परत पनवेलला आलो. आता इतर जिल्ह्यात लॉकडाऊन लागत आहे. पनवेललाही लागेल, अशी भीती सतावत आहे. - अनिल राठोड, कामगार
गेल्यावर्षी माझी नोकरी गेली. आता तळोजा एमआयडीसी येथे रोजंदारीवर काम करत आहे. दिवसेंदिवस कोरोना वाढत आहे. यंदाही लॉकडाऊन होईल, अशी भीती वाटत आहे. गावाकडे परिस्थिती चांगली नाही. हातावर पोट आहे. त्यामुळे लॉकडाऊन यावेळी तरी नको. गतवर्षी खूप हाल झाले आहेत. - अविनाश तोंडरे, कामगार