वीर स्थानकावर प्रवाशांची कसरत
By admin | Published: October 5, 2015 12:29 AM2015-10-05T00:29:34+5:302015-10-05T00:29:34+5:30
कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास
दासगाव : कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत गाडी पकडण्याकरिता कसरत करावी लागत आहे. ही समस्या गेली अनेक वर्षांपासून असून कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील महाडपासून जवळपास बारा किमी अंतरावर असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर गेली अनेक वर्षांपासून प्रवाशांना एकाच वेळेस दोन गाड्या फलाटावर आल्यास रुळ ओलांडत पलीकडे जावे लागते आणि ट्रेनमध्ये चढावे लागते. महाड या ऐतिहासिक शहराला लांब ठेवून कोकण रेल्वेने वीर दासगावपासून आपला मार्ग कोकणाकडे वळवला आहे. आजही हा एकेरी मार्ग असल्याने अनेक वेळा रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस प्रवाशांना १० ते १५ मिनिटे एखाद्या स्थानकात ताटकळत बसावे लागते. या मार्गावरून जवळपास २५ गाड्या जात असल्या तरी कोकणवासीयांकरिता अवघ्या तीनच तीन गाड्या सोडल्या जातात. यामध्ये दादर-सावंतवाडी आणि राज्यराणी एक्स्प्रेस, दिवा-मडगाव या गाड्यांचा समावेश आहे. बाकी सर्व गाड्या कोकणातून कर्नाटकात जातात. या एक्स्प्रेस गाड्या जात असताना या मार्गावरील बहुतांश स्थानकात रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस लोकल गाड्यांना थांबावे लागते. महाडजवळील वीर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक महाड शहरालगत असले तरी या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीच विशेष सुविधा पुरवलेली नाही.
वीर रेल्वे स्थानकात ही स्थिती आठवड्यातून जवळपास तीन ते चार वेळेस निर्माण होते. वीर रेल्वेस्थानकात एकाच बाजूला प्रवाशांना शेड आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस फलाटावर एखादी गाडी उभी असल्यास प्रवाशांना फलाट उतरून पलीकडे जावे लागते. ही स्थिती पलीकडे थांबलेल्या गाडीमधील प्रवाशांची देखील होते. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत फलाटावर चढताना कसरत करावी लागते. रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना देखील दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे मोठ्या शहरातून रेल्वे रुळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या बेजबाबदारपणामुळे वीर रेल्वे स्थानकात मात्र प्रवाशांना रुळावरूनच कसरत करावी लागत आहे.
कोकण रेल्वेबाबत अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. वीर रेल्वे स्थानकात दोन्ही बाजूला प्रवासी शेड आणि ओव्हरब्रिज करणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना करावा लागणारा रुळावरील धोकादायक प्रवास थांबणार आहे. (वार्ताहर)