भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:06 PM2019-12-12T23:06:05+5:302019-12-12T23:06:33+5:30

पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

Workshop on Marine Fisheries Business | भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा

भरडखोलमध्ये सागरी मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा

Next

दिघी : भारत सरकार मत्स्यपालन मंत्रालय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई येथील भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभागाच्या वतीने सागरी मत्स्यव्यवसायावर कार्यशाळा घेण्यात आली. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावात ९ ते १० डिसेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय ओपन हाउस कार्यशाळेत ३०० हून अधिक महिला व कोळी बांधवांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन रायगडभूषण रामचंद्र वागे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील समुद्र संपत्ती व त्यावरील पर्यावरणपूरक मासेमारी पद्धतीची माहिती या वेळी देण्यात आली.
भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण मुंबई बेसचे वैज्ञानिक डॉ. शैलेंद्रकुमार दिवेदी, अशोक कदम, आमोद ताम्हाणे, स्वप्निल शिर्के , आणि डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. याशिवाय मत्स्यव्यवसायाबद्दल विस्तृत माहिती सोबतच पदवी किंवा पदव्योत्तर शिक्षणानंतर संशोधन आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

मत्स्य व्यवसायामध्ये समुद्रातील सुरक्षितता, स्वच्छतापूर्वक माशांची हाताळणी, इंधन बचतीसाठी उपाय, ट्रालिंग मासेमारीबद्दल सद्यस्थितीत घ्यावयाची खबरदारी व यातून आवश्यकतेनुसार वेळोवेळी मच्छीमार बांधवांना हवी असलेली मदत पुरवण्यात येईल. मत्स्यसाठ्याचे व्यवस्थापन संरक्षण आणि निरंतर उपयोगितावर भर देत पर्यावरणप्रिय मासेमारी टिकवण्याचा आग्रह या वेळी मार्गदर्शकांनी केला. सागरी नियमांची माहितीही या वेळी मच्छीमारांना देण्यात आली. या वेळी १०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांनी लाभ घेतला.

उपसरपंच किशोर भोइनकर, पिंपळादेवी मच्छीमार सोसायटी अध्यक्ष ज्ञानेश्वर वागे, किनारा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष नामदेव पावशे, शिवशक्ती मच्छीमार सोसायटी अध्यक्ष हरिश्चंद्र खोपटकर, भरडखोल कोळी समाज अध्यक्ष भास्कर चौलकर, उपाध्यक्ष गोविंद पाटील, उपस्थित होते. कोळी बांधवांनी वैज्ञानिकांकडून जास्तीत जास्त माहिती घेऊन आपला पारंपरिक व्यवसाय अखंडपणे चालू राहण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन वागे यांनी केले.

पर्यावरणप्रिय मासेमारी पद्धतींची सखोल माहिती या वेळी देण्यात आली. मत्स्यसाठ्याच्या उपलब्धतेसाठी घ्यावयाच्या खबरदारी आणि उपायांमध्ये वैज्ञानिक, शासन यांच्या सहकार्याची गरज आहे. या कार्यशाळेचा मत्स्यव्यवसायात फायदा होईल.
- हरिओम चोगले, सरपंच, भरडखोल

Web Title: Workshop on Marine Fisheries Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.