अलिबाग : रायगड जिल्ह्याची जलस्वराज्य प्रकल्प - २ साठी निवड झाली असून, या प्रकल्पाला जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानाची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याला भेट दिली. अलिबाग-रेवसमधील फाऊंटन हेड हॉटेल येथे जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण केले.अलिबाग तालुक्यातील नागाव आणि कावीर ग्रामपंचायतींना त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील बिड बुद्रुक आणि शिरसे ग्रामपंचायतीमधील तमनाथ आदिवासीवाडी या गावांना जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने अनुक्रमे २ आणि ३ मे रोजी भेट दिली. अलिबाग येथील नागाव आणि कावीर येथील ग्रामपंचायतींना जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी कर्जत येथे ३ मे रोजी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी शिष्टमंडळाने स्थानिक ग्रामस्थांकडून गावातील स्वच्छतेबाबतची माहिती घेतली. त्याचबरोबर जलस्रोतांची माहितीही जाणून घेतली.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी स्वच्छ भारत अभियान, जलस्वराज्य प्रकल्प - २ बाबत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती जागतिक बँक वॉशिंग्टनचे अधिकारी लिवॉन वाँग (चीन), रोजर सुलवान (अमेरिका), मीना मुशी (अमेरिका), डोंगुही पर्क (द. कोरिया), भावना भाटिया (दिल्ली) आणि अक्षय कश्यप (दिल्ली) यांना दिली. मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर यांनी दुभाषिक म्हणून समन्वय साधला. जिल्ह्यात सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी उप-मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, गटविकास अधिकारी वीणा सुपेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जागतिक बँक पोचली गावात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 1:50 AM