जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन, उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील अवध बिहारी लाल यांनी स्वेच्छेने वृक्षसंवर्धन जागृतीचे व्रत स्वीकारले. त्यांच्या या वृक्षसंवर्धन जागृती मोहिमेस ३० जुलै १९८०मध्ये भारत-नेपाळ सीमेवरील लखिपूर या गावातून प्रारंभ झाला. या मोहिमेत जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप या दोघा तरुणांबरोबर हळूहळू इतरही काही जण जोडले गेले. सद्य:स्थितीत त्यांचा एकूण २० जणांचा चमू जगभरातील महाविद्यालयांमध्ये वृक्षसंवर्धन व स्त्रीभू्रणहत्या प्रतिबंध याविषयी जागृतीचे काम करत आहे. गेल्या ३७ वर्षांत जगभरातील तब्बल ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्रांत करून जागतिक पर्यावरणवारीचे हे तीन ध्येयवेडे वारकरी मंगळवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधत आंग्रेनगरी अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. या पदयात्रेची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दोन वेळा, तर ‘लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तब्बल पाच वेळा झाली असल्याची माहिती या जागतिक पर्यावरण पदयात्रेचे प्रणेते अवध बिहारी लाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दिवसभरातील सुमारे २० तासांत सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतर ते चालतात. केवळ चार तासांची विश्रांती आता सवयीमुळे पुरेशी होत असल्याचे अवध बिहारी लाल यांनी सांगितले. भारत, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, बर्मा, चीन, थायलंड, अफगाणिस्तान, मॅनमार या ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्र ांत करताना सर्व देशांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असतानाचा स्थानिक विद्यार्थी व प्रशासनाच्या सहयोगाने एकूण ७ कोटी ५० लाख वृक्षलागवड केली असल्याचे प्रताप यांनी सांगितले. कोणत्याही शहरात जनजागृती के ल्यावर महाविद्यालये, प्रशासनाला रोपांची व्यवस्था करण्यास सांगितले.अलिबागमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेतली. पारसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी त्यांना स्थानिक परिसराबाबत माहिती दिली.
जागतिक पर्यावरणवारीचे ध्येयवेडे वारकरी
By admin | Published: July 05, 2017 6:33 AM