- जयंत धुळपअलिबाग - निसर्गाने अन्याय केलेल्या परंतु स्वतःच्या इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देणाऱ्या दिव्यांगांनी पुन्हा एकदा कमाल केली. रायगड किल्ला पायऱ्यांनी झपाझप चढून त्याची भ्रमंती करण्याचे साहस मुंबईतील पंचावन्न दिव्यांगांनी करून दाखवले. जूहूच्या रोटरी क्लब आणि फिनिक्स फाऊंडेशनच्या दिव्यांग मित्रांनी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला केलेले हे साहस भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारे ठरले.मुंबईहून 1 डिसेंबरला सकाळी फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने दिव्यांगांच्या रायगड स्वारीला प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि किल्ले रायगडाच्या घाटातील काही अपघात यामुळे रायगड स्वारी करण्यास संध्याकाळ झाली. चढाई करेपर्यंत होणाऱ्या काळोखाची तमा न बाळगता दिव्यांगांनी सायंकाळी 4 वाजता रायगड किल्ल्याच्या नाणे दरवाजापासून चढायला सुरूवात केली. कोणी कुबड्या घेऊन, तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन, असे पन्नासएक दिव्यांग रायगड चढत होते. सुट्टीचा वार असल्याने पायवाटेवर गर्दीही होती. सोबतीला फिनिक्स फाऊंडेशनचे सोबती होते. त्यामुळे सर्वांना सांभाळून नेलं जात होतं. रविवारचा संपूर्ण दिवस दिव्यांगांनी इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती केली. ढोपराखाली सळई बसविलेल्या विनोद रावत यांनी तर आपली प्रतिक्रिया देण्यापूर्वी जय शिवाजी जय भवानी अशी गर्जना केली. अंगात हत्तीचं बळ आलेले रावत भावनावश झाले होते. फिनिक्स फाऊंडेशनचे आभार मानून त्यांनी रायगड सर करताना कोणताही त्रास झाला नसून उत्साहाला उधाण आल्याचं सांगितले. छत्रपतींचे हे विश्व पाहताना मावळा झाल्यारखे वाटत असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर आयोजक दिनेश पाटील व फाऊंडेशनचे संस्थापक संतोष संसारे यांनी हा उपक्रमाद्वारे दरवर्षी वेगवेगळे गड, शिखर दिव्यांग मोठ्या उत्साहाने सर करतात. त्यांचा आनंद हेच संस्थेचे यश असते, अशा भावना व्यक्त केल्या.गेली अठरा वर्षे फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील साहसी भ्रमंतीत दिव्यांगांना सहभागी करण्याचे धाडस केले जात आहे. कळसूबाईसारखे उंच शिखर, अनेक सुळके, लोहगडासारखे अवघड किल्ले यापूर्वी अशा दिव्यांगांनी फिनिक्स फाउंडेशनच्या मदतीने सर केले आहेत. या साहसी उपक्रमास महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सहभागी दिव्यांगांची भेट देऊन त्यांच्या उपक्रमास शाबासकी देऊन दिव्यांगांचे कौतुक केले.
जागतिक अपंग दिन विशेष: दिव्यागांची रायगडावर यशस्वी चढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 9:43 PM