कर्जतमध्ये २,६०८ गौरींचे पूजन; सुवासिनींनी घेतला ओवसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:48 PM2020-08-26T23:48:16+5:302020-08-26T23:48:37+5:30
फुलांच्या, मूर्तीच्या गौरींची प्रतिष्ठापना
कर्जत : रायगड जिल्ह्यात गौरी-गणपती सणाला फार महत्त्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर, घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा सोहळा पार पडला. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १,३४५, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १,२५२, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ अशा २,६०८ गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. कुणी दीड दिवसांनी, कुणी पाच दिवसांनी, कुणी गौरींबरोबर, कुणी वामन नवमी, तर कुणी अनंत चातुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करतात. मात्र, गौरींचे आगमन एकाच वेळी होते. कुणी मूर्तीचे गौर पूजतात, तर कुणी आदल्या दिवशी पहाटेच रानात जाऊन गौरी पूजनाच्या पूर्वसंध्येपर्यंत कचोऱ्याची फुले (गौरीची फुले) व तेरड्याच्या फुलांसकटच्या फांद्या आणतात. त्यानंतर, महिला रात्रभर गाणी गात गौर सजविण्यात गुंततात. साडी नेसवून गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लाऊन खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या गौरी तर कुणाच्या नाचºया गौरी असतात. त्यांचे पूजन मात्र सारख्याच पद्धतीचे असते.
दुपारी गौरीचे पूजन झाल्यावर घरातील सुवासिनी नटून थाटून सुपामध्ये पूजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओवसा घेतात. विशेष म्हणजे, नववधूने हा ओवसा घेतलाच पाहिजे, असे परंपरेनुसार ठरलेले आहे. यावेळी उकडलेल्या पिठांचे दिवे लावून गौरींना ओवाळले जाते. या सोहळ्याचा आनंद घरातील सारेच जण अगदी आनंदात घेतात. बºयाच ठिकाणी केवळ गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गौर आणली जात नाही. काहींची गौर एकच असते, अशा ठिकाणी सारे कुटुंबीय गौराई असलेल्या मोठ्या घरी एकत्रित होतात.