अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारी खोपोलीची पूजा साठेलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:40 AM2019-03-08T00:40:07+5:302019-03-08T00:40:24+5:30
आज विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेत आपले कर्तृत्व सिद्ध के ले आहे. फक्त चूल आणि मूल यामध्ये आजची महिला अडकलेली नाही हे दिसून येत आहे.
खोपोली : आज विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेत आपले कर्तृत्व सिद्ध के ले आहे. फक्त चूल आणि मूल यामध्ये आजची महिला अडकलेली नाही हे दिसून येत आहे. एखाद्या ठिकाणी अपघात झाला अथवा दुर्घटना घडली की मुली किंवा महिला साधारणपणे रस्त्यावर उतरून काम करताना दिसत नाहीत. मात्र, खोपोलीतील पूजा गुरु नाथ साठेलकर (२५) ही तरुणी याला अपवाद आहे.
वडील गुरुनाथ साठेलकर यांनी सुरू केलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे ती काम करते. रस्ता अपघात, ट्रेकर्सचे अपघात, धरणात, नदीत बुडालेल्यांना मदत, प्रवाशांना मदत, अॅम्ब्युलन्स आॅपरेशन, मेडिकल असिस्टंटस या सर्व धाडसाच्या कामांमध्ये पूजाचा हिरिरीने सहभाग असतो.
सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केरळवासी पूरग्रस्तांना मदत गोळा करणे, गरीब गरजूंना धान्य, कपडे, पांघरूण, फराळ, शालोपयोगी साहित्य वाटप, रु ग्णांना जेवण वाटप अशा विविध समाजिक कार्यामध्ये सहभागी असते. वाहतूक नियंत्रण, स्वच्छता अभियान, सुरक्षा अभियान, आरोग्य अभियान यासाठीही तिचा पुढाकार असतो.
सिव्हिल इंजिनीअर झालेली पूजा ही सर्व कामे ती तिचा व्यवसाय आणि इतर कौटुंबिक, सामाजिक कर्तव्ये पार पाडून करत असते. पूजा साठेलकर हिच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून तिला तेजस्विनी पुरस्काराने गौरविले आहे. या पुरस्कार प्राप्तीमुळे पूजावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
>पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंजू बिलछाडी
खोपोली : असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही की ज्यामध्ये महिला या काम करत नाहीत. मात्र, पेट्रोल पंपावर काम करताना आपण प्रामुख्याने पुरु ष वर्गालाच बघतो. आता या क्षेत्रातही महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत.
खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या पेट्रोल पंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या दोन महिन्यांपासून काम करीत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. १० वीपर्यंत शिक्षण झालेल्या मंजू यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी असल्याने रोजगार मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याचे काम करीत आहेत. खालापूर तालुक्यात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.