‘निसर्गाने‘ दिलेली जखम भळभळतेय, बागायतदार आर्थिक संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:38 AM2021-05-04T01:38:02+5:302021-05-04T01:38:48+5:30
उद्ध्वस्त बागेत ५० टक्केच सुपारीचे पीक : मुरुडचे बागायतदार आर्थिक संकटात
मुरूड जंजिराः गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात ३२ टक्के बागायतीचे क्षेत्र बाधित झाले हाेते. यावर्षी सुपारीचे पीक ५० टक्क्यांपेक्षा कमी आले आहे. त्यामुळे बागायतदार चांगल्याच आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील २५०३ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर बागायत क्षेत्र ३ जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाले होते. या वादळामुळे असंख्य शेकडोच्या संख्येने सुपारी व नारळाची झाडे जमीनदोस्त झाली हाेती.
चक्रीवादळात बागायतीतील उत्पन्न देणारी तसेच फळांनी चांगली बहरलेली झाडे मोडली. त्यामुळे यावर्षी सुपारी उत्पादनाचे प्रमाण घटले आहे. सहकार तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघात एप्रिल महिन्यापर्यंत माप घालणाऱ्या बागायतदारांनी या घडीला केवळ पन्नास टक्केच सुपारीचे माप घातले आहे. पुढील महिनाभरातही खरेदी-विक्री संघात सुपारी येणार नाही अशी परिस्थिती असल्याने बागायतदारांचे नुकसान केले आहे.
श्रीवर्धनी रोठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपारीला चांगला भाव मिळतो. येथील सुपारी मोहरा, मोती, वत्सराज अशा उत्तम जातीची असल्याने तालुक्याबाहेरील घाऊक व्यापारीही स्थानिक बागायतदारांकडून थेट सुपारी खरेदी करतात तर सुमारे दोन हजारांवर बागायतदार सुपारी संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल दरवर्षी येथील सुपारी संघातर्फे केली जाते. यापूर्वी सदर सुकलेल्या सुपारीची फोड करून तिची निवड करून वाशी मार्केटमधील दलालांना कमिशन देऊन सुपारीची विक्री केली जात असे परंतु अलीकडे यात बदल करून थेट सुरत-गुजरात येथील मार्केटमध्ये नेऊन सरसकट विक्री केली जात असल्याने दलाली व सुपारीच्या निवडीचा खर्च वाचला असल्याने बागायतदारांना घाऊक व्यापाऱ्यांपेक्षा चांगला भाव मिळवून देण्यात संघ यशस्वी झाला. चालूवर्षी एक मण सुपारीला (२० कि.ग्रॅ.) सहा ते साडेसहा हजाराचा भाव मिळवून देऊ.. गेल्यावर्षी मुरुडच्या सुपारी संघात ७२५ खंडी (१ खंडी=४०० कि.ग्रॅ.) असोली सुपारी जमा झाली होती. यावर्षीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना पन्नास टक्केही सुपारी जमा झालेली नाही. उपलब्ध सुपारीला चांगला भाव मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष महेश भगत यांनी सांगितले.
दहा वर्षे उत्पन्न मिळविण्याची वाट
nचक्रीवादळात बागायतीतील उत्पन्न देणारी बहरलेली झाडे मोडली. सुपारी पिकाची नवीन लागवड केल्यापासून किमान दहा वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारने अनुदान अतिशय तुटपुंजे जाहीर केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
nकोकणातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान कधीही भरून मिळणार नाही. एका चक्रीवादळाने शेतकऱ्यांना दहा वर्षे पाठीमागे नेऊन ठेवले आहे.पुढील तक्ता नुकसानीचा आलेख दाखवणारा आहे.
एकूण स्थिती
पिके एकूण लागवड क्षेत्र झालेले नुकसान
आंबा १५९० हेक्टर ६२९ हेक्टर
नारळ ४३५ ७८
सुपारी ४१६ १४२
इतर पिके ६२ ४५