सीबीडीतील गांजा अड्ड्यावर धाड
By admin | Published: September 8, 2016 02:58 AM2016-09-08T02:58:28+5:302016-09-08T02:58:28+5:30
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई बनविण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीमध्ये धाड टाकून पोलिसांनी एक किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला
नवी मुंबई : अमली पदार्थमुक्त नवी मुंबई बनविण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीमध्ये धाड टाकून पोलिसांनी एक किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला असून विशाल घोडे याला अटक केली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस आयुक्तालय क्षेत्रात धाडसत्र सुरू केले आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा तीन महिन्यांत १५ गुन्हे दाखल झाले असून २० आरोपी गजाआड झाले आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे.
सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील टाटानगर झोपडपट्टीमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राणी काळे व त्यांच्या पथकाने येथील अड्ड्यावर सोमवारी रात्री धाड टाकली. विशाल घोडे हा तरुण गांजा विक्री करत असताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे एक किलो ७८ ग्रॅम गांजा सापडला आहे. त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राणी काळे, अमित शेलार, सचिन भालेराव, अमोल कर्डीले व इतर सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)