मधुकर ठाकूर, उरण : उरणमध्ये दत्तजयंती उत्सवानिमित्ताने भरवल्या जात असलेल्या यात्रेत हजारो यात्रेकरूंनी सहभाग घेतला आहे. परिसरातील चिरनेर, मोरा आदी विविध ठिकाणची दत्त मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.
उरण शहरातील दत्तजयंती निमित्ताने भरलेल्या यात्रेला रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. उरण शहरातील वैष्णवी हॉटेलपासून चारफाटा, कोटनाका दरम्यानचे एक किमीच्या रस्त्यावर विविध प्रकारची शेकडो दुकानं लावण्यात आली आहेत. यात्रेत खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
उरण शहरातील एनआय हायस्कूल समोरील पटांगणात सर्वांसाठी आकाश पाळणे , मौत का कुआ , तोरा -तोरा , ड्रॅगन ट्रेन ,कोलंबस ,मिनी ट्रेन आदी करमणुकीची साधने लावण्यात आली आहेत. खाण्यापिण्यासाठीही ठिकठिकाणी पाव-भाजी , पिझ्झा , मालवणी, न्युडल्स , कुल्फी अशी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आली आहेत. यात्रेत हार ,फुले ,पेढे ,नारळ , मिठाईची दुकाने ,अलंकार , आकर्षक भांडी ,वस्तू ,कपडे ,शोभिवंत आकर्षक वस्तू ,बच्चेकंपनीसाठी आकर्षक खेळणी आदिंची मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटण्यात आली आहेत.
यामुळे सध्या तरी उरणची यात्रा गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. तसेच उरण परिसरातील मोरा,उरण, चिरनेर व इतर ठिकाणची दत्तमंदिरे भाविकांच्या गर्दीने अगदी फुलून गेली आहेत.