अलिबाग - मूळचे यवतमाळचे असलेल्या दोन भावंडांचा रविवारी दुपारी झोपेत मृत्यू झाला. ही घटना अलिबागमधील किहीम आदिवासीवाडी येथे घडली. या प्रकरणी मांडवा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत. आराध्या सदानंद पोळे (६ वर्षे) व सार्थक संदानंद पोळे (३ वर्षे), अशी मृत भावंडांची नाव आहेत.
शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत वर्षभरापासून काम करत आहेत. दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते. बराच वेळ झाला तरी दाेघेही उठले नाहीत. त्यामुळे त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता त्यांची काहीएक हालचाल हाेत नव्हती. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले. ही दुर्दैवी माहिती समजताच जिल्हा रुग्णालयात शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती.
अहवालानंतर मृत्यूचे कारण हाेणार स्पष्टया मृत्यू प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले आहेत. या मुलांचे अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या मूळगावी पुसद-यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत. याबाबत जे. जे. रुग्णालय यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे सांगितले.
या प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.