- निखिल म्हात्रेअलिबाग : दिवाळी आता काही दिवसांवर आली असल्याने, गृहिणी फराळ बनविण्याच्या लगबगीला लागल्या आहे. फराळाची रेसीपी सर्वांनाच जमते, असे नाही. खर्च करून तयार केलेला फराळ पाहुण्यांच्या पसंतीस नाही पडल्यास मोठी पंचायत होते. यावर उपाय म्हणून रेडीमेड फराळ विकत घेण्याकडे नोकरदार महिलांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा घेत, अलिबागमधील महिला बचत गट, महिला गृहउद्योगांनी दिवाळीचा फराळ बनविण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, कोरोनाच्या संकटामुळे फराळ तयार करण्यासाठी लागणारा जिन्नस महागल्याने फराळावरही महागाई आली आहे. हॉटेल किंवा दुकानांमधून विकत घेतलेल्या अन्नपदार्थांच्या दर्जाची अनेक वेळा शाश्वती नसते. त्याचबरोबर, त्यांचे दरही परवडण्यासारखे नसतात. अलीकडे कामधंदा करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढलेले असल्याने, अशा महिला खात्री असलेल्या ठिकाणावरूनच तयार फराळ विकत घेण्यावर जास्त भरवसा करतात. आणि फराळ विकत घेतात.