तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:19 AM2019-05-08T02:19:40+5:302019-05-08T02:29:01+5:30

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत

 This year the number of tourists is less | तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

Next

दासगाव - राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत, तर तापमान ४२ अंशांच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने पर्यटकदेखील किल्ले रायगडाकडे फारसे फिरकत नसल्याने याचा परिणाम रायगडावरीलपर्यटनावर झाला आहे. यामुळे या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. कधी नव्हे ते या परिसरातील तापमान ४२ अंशांहून अधिक गेले आहे. केवळ २० टक्के पर्यटकच रायगडकडे येत असून पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. तीव्र उन्हामुळे रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय, गडावर पर्यटन करताना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोपवेने दररोज १ ते २ हजार पर्यटकांची ये-जा होत असते; परंतु ही संख्या घटून २०० ते ५०० च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुट्टी पडली असून, अनेकदा सलग सुट्टीही आल्या होत्या; परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग्स, दही-ताक विक्रे ते, टोप्या विक्रे ते, रोपवे, अशा सुमारे ७० व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.

रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात; परंतु यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाल्याचे गणेश ढवळे या विक्रे त्याने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपुरी आहे तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोपवे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते, त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यावसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान कशी भागवायची हा प्रश्न आहे.

महाड आणि संपूर्ण कोकण परिसरात ऐन सुट्टीच्या काळात चाकरमानी गावात येण्याचे प्रमाण मोठे असते. मात्र, यंदा ऐन सुट्टीच्या मे महिन्यात मात्र एस.टी.ला गर्दी दिसून येत नसल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.

गाड्यांना गर्दीच नाही

पर्यटन हंगामाच्या काळात नेहमी महाड आगार गजबजलेले असायचे. मात्र, सध्या गाड्यांना फारशी गर्दी नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकही हतबल झाले आहेत. यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याने फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  This year the number of tourists is less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.