आविष्कार देसाई रायगड : पेण हे गणेशमूर्ती व्यावसायिकांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोनाचे संकट आणि नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे यंदा या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या आणि घाऊक बाजारपेठेत विकल्या जाणाºया मूर्तींची मागणी घटल्याने तब्बल ५0 कोटी रुपयांचा आर्थिक फटका येथील उद्योगाला बसला आहे. दरवर्षीच्या १५0 कोटींच्या उलाढालीच्या तुलनेत यंदा १00 कोटी उलाढाल झाली आहे.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेशमूर्तींना जगभरातून विशेष मागणी असते. विशेषत: अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, आॅस्ट्रेलिया, कॅनडा अशा विविध देशांमध्ये पेणच्या कारखान्यांमधून गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. तसेच देशांतर्गत व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पेणमधून परदेशात सुमारे ३० हजार गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. मात्र यंदा याच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला.>प्रत्येक व्यवसायाच्या व्याख्या बदलल्या आहेत. निर्यातीवर तसाच घाऊक विक्रीवरही परिणाम झाला आहे. एकूण व्यवसायात किमान ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बदललेल्या नियमांमुळे व्यवसायावर दूरगामी परिणाम झाला आहे.- श्रीकांत देवधर, अध्यक्ष, गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ
पेणमध्ये यंदा केवळ १०० कोटींची उलाढाल, निर्यात रोडावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:36 AM