पनवेल : शहरात तीव्र पाणीटंचाई सुरू असताना होळी खेळण्याकरिता पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पनवेल नगरपरिषद, पोलीस, सामाजिक, राजकीय आणि गृहनिर्माण संस्थांनी केले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यंदा शहरात कोरडी होळी खेळली गेली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टाळता आल्याने सिडको, पालिका, एमजेपी, एमआयडीसीने जनतेचे आभार मानले आहे.शहरी भागात धरण क्षेत्रात पाणी साठा कमी असल्याने ४0 ते ५0 टक्के पाणीकपात सुरू आहे. त्याला पनवेल परिसर सुध्दा अपवाद नाही. पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोलीला एमजेपीकडून पाणीपुरवठा होतो. मात्र पाताळगंगा नदीच्या पात्रात पाणीच नसल्याने एमजेपीने पालिका आणि सिडकोला पाणीकपात केली आहे. त्यामुळे या तीनही शहरात पाण्याची कमतरता जाणवत आहे. तळोजा एमआयडीसीत तीन दिवस पाणी येत नसल्याने कारखानदार मेटाकुटीस आले आहेत. टंचाईवर मात करण्याकरिता संबंधित यंत्रणा दिवस-रात्रप्रयत्न करीत आहेत. प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा वापर, बोअरवेल, नादुरुस्त विहिरी वापरात आणण्याकरिता यंत्रणा प्रयत्नशील आहे. तसेच पाणीगळती, अपव्यय, चोरी थांबविण्याकरिता उपाययोजना सुरू आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळताना लाखो लिटर पाणी फेकले जाते. यंदाचा दुष्काळ व पाणीटंचाईचा विचार करता सर्वांनीच पाणीबचतीकरिता पुढाकार घेतला. अपवादात्मक ठिकाणी वगळता कुठेही पाण्याचा अपव्यय झालेला आढळला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक संस्थांनी पाणी वाया न घालविण्याचे आवाहन केले.पाणीबचतीकरिता केलेली जनजागृती त्याचबरोबर आवाहनाची फलश्रुती गुरुवारी दिसली, याचे कारण म्हणजे सिडकोत नागरिक कोरडी होळी खेळले आणि पाण्याचा अपव्यय टाळला, याकरिता माध्यमांची मोठी मदत झाली.- दिलीप बोकाडे,कार्यकारी अभियंता, सिडको, पाणीपुरवठा विभाग
यंदा लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टळला
By admin | Published: March 25, 2016 12:36 AM