फणसाड अभयारण्यात यंदा जुजबी स्वरूपात होणार वन्यजीव प्रगणना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:50 AM2020-05-07T01:50:25+5:302020-05-07T05:51:20+5:30

राजवर्धन भोसले यांची माहिती : आजपासून होणार सुरुवात; किमान चार दिवस १३ कर्मचारी करणार काम; पाण्याच्या ठिकाणी माची बांधणार

This year, wildlife census will be conducted in the form of Jujabi in Phanasad Sanctuary | फणसाड अभयारण्यात यंदा जुजबी स्वरूपात होणार वन्यजीव प्रगणना

फणसाड अभयारण्यात यंदा जुजबी स्वरूपात होणार वन्यजीव प्रगणना

Next

संजय करडे
 

मुरुड : फणसाड अभयारण्यातील वन्यजीव यांची प्रगणना दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होत असते. उद्यापासून या प्रगणनेला सुरुवात होत आहे. ही प्रगणना किमान चार दिवस सुरू राहते. पाण्याच्या पाणस्थळाच्या ठिकाणी लाकडाची माची उभी करून वन्यजीव यांचे निरीक्षण करून ही प्रगणना केली जाते. यंदाची वन्यजीवांची प्रगणना ही जुजबी स्वरूपात होणार असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली.

मुरुड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही सामावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर वसलेले फणसाड अभयारण्य मुंबईपासून १५४ किलोमीटर अंतरावर पनवेल पेण व अलिबाग मार्गावर आहे. फणसाड अभयारण्यात बिबट्या, सांबर, भेकर, रानटीडुक्कर, शेकरू, खवल्या मांजर, माकड, हनुमान लंगूर, रानगवे, पिसोरी, मोर, ससा, घोरपड आदीसह इतर आकर्षक प्राणी आढळतात.

फणसाड क्षेत्रात २७ पाणवटे असल्याने वन्यजीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता नाही. दरवर्षी प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी पनवेल अथवा मुंबई येथील संस्था आम्हाला मदतीसाठी येत असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व भागात संचारबंदी असल्यामुळे फणसाड अभयारण्यातील उपलब्ध कर्मचारी वृंदांकडून वन्यजीवांची प्रगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची प्रगणना जुजबी स्वरूपात होणार आहे, असे राजवर्धन भोसले यांनी सांगितले.

फणसाड अभयारण्यातील १३ कर्मचारी पाण्याच्या ठिकाणी माची बांधून रात्र व दिवस असा पहारा करून वन्यजीव यांची प्रगणना करणार आहेत. साधरणत: दोन ते तीन दिवस असे हे काम सुरू राहणार आहे. प्रचलित नियमावलीनुसार प्राण्याची गणना करण्यात येणार आहे.
- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरुड

कर्नाळा अभयारण्यात गणना नाही
कोविड-१९ (कोरोना )या साथीच्या आजाराने सध्या संपूर्ण जग ठप्प झाले आहे. भारतातदेखील १७ मेपर्यंत लॉकडाउन पुढे ढकलले आहे. या लॉकडाउनमुळे दरवर्षी ७ मे रोजी होणारी वन्यजीव गणना पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यात यावर्षी प्राण्याची गणना होणार नाही.

प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षण नागपूर यांनी यासंदर्भात वनविभागाला स्पष्ट आदेश दिल्याने यावर्षीची प्राण्यांची गणना रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा अभयारण्य पी. पी. चव्हाण यांनी देखील यावर्षी प्राण्यांची गणना होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाळा अभयारण्याच्या १२.१५५ चौरस किलोमीटरच्या या अभयारण्याच्या परिसरात सुमारे १४७ प्रजातीचे पक्षी राहतात. यात ३७ स्थलांतरित प्रकारच्या दुर्मीळ पक्ष्यांचाही समावेश आहे. यांसह हिंस्र अशा वन्यजीवांचा वावरदेखील याठिकाणी आहे. यामध्ये रानडुक्कर, भेकर, बिबट्या आदीसह अनेक प्राण्यांचा वावर आहे.

बुद्धपौर्णिमेला पूर्ण चंद्र असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत रात्री चंद्राचे प्रकाश जास्त असते. अशा वेळी रात्री पाणवठे आदी ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी आल्यावर ते वनविभागाने लावलेल्या नाईट मोड कॅमेऱ्यात सहजपणे कैद होतात. या प्राणिगणनेत दरवर्षी स्थानिक आदिवासी बांधव तसेच ग्रामस्थांची मदत घेतली जाते. मात्र, लॉकडाउनमुळे प्राण्यांची गणना रद्द करण्यात आली आहे.

१४७ प्रजातीचे पक्षी, ३७ स्थलांतरित दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश

Web Title: This year, wildlife census will be conducted in the form of Jujabi in Phanasad Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल