अलिबाग : रायगडात पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिना उजाडताच दमदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे. ७ सप्टेंबरपासून पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे.
शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. अती मुसळधार पाऊस दिला असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात चार महिने साडे तीन हजार मिमी पाऊस दरवर्षी पडत असतो.
चार महिने पावसाचे दमदार आगमन होते. मात्र यंदा जून मधील पंचवीस दिवस वीना पावसाचे गेले. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पूर्ण जुलै महिना पावसाने जिल्ह्यात ठाण मांडला. जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती, दरड दुर्घटना घडल्या. तर जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पाऊस पडला आहे.
ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिना उजाडल्यानंतर पावसाची चाहूल लागली असल्याने शेतकरी सुखावला आहे. ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पडणार आहे. जिल्ह्याला यलो अलर्ट असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात अनेक भागात पावसाची मोठी सर येत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी ही सुखावला आहे. सतत पाऊस पडत असला तरी नद्या ह्या इशारा पातळी खालून वाहत आहे. त्यामुळे कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे. मात्र काही सखल भागात पाणी साचले आहे.