"योगमुळे एकाग्रता वाढते, थकवा दूर होतो", निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्केंची माहिती
By निखिल म्हात्रे | Published: June 21, 2024 03:10 PM2024-06-21T15:10:58+5:302024-06-21T15:12:08+5:30
आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नित्याने योगा करणे अत्यावश्यक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी उपस्थितांना सांगितले.
अलिबाग - योग केल्याने एकाग्रता वाढते, आत्मविश्वास बळावतो. वेगवेगळ्या योगाअभ्यासामुळे शरीर लवचिक होते. स्नायूंना बळकटी मिळते. कोरोना काळात रोग प्रतिकार शक्तीचा अभाव निर्माण झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनानंतर बोध घेत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपचार पद्धती सुरु केल्या. ध्यानधारणेमुळे ताणतणाव कमी होतो. आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नित्याने योगा करणे अत्यावश्यक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी उपस्थितांना सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अलिबाग येथील सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत पोलीस मुख्यालय येथेल जंजीरा सभागृहात रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के बोलत होते.
शिर्के पुढे म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आरोग्य संपन्न करणारे शास्त्र म्हणजे योग आहे. दैनंदिन योग अभ्यासामुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते. त्यामुळे सर्वांनी आपल्या धावपळीच्या जिवनातून स्वतासाठी थोडा वेळ काढून योग करणे महत्वाचे आहे. योग केल्याने आपल्यामध्ये स्थिरता येऊन स्वास्थ्य अधिक चांगले होते. आजारांपासून मुक्तता मिळते, मानसिक स्वास्थ अधिक बळकट होते.समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने "वसुधैव कुटुंबकम्" या पार्श्वभूमीवर आधारित वन वल्ड वन फॅमिली हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे, हा वैश्विक उद्देश या मागे आहे.
यानिमित्ताने योग अभ्यासाचे महत्वही संदेश शिर्के यांनी विषद केले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तपस्वी गोंधळी यांनी सर्वांचे वॉर्मअप व्यायाम घेतले. त्यानंतर योग दिनानिमित्त संकल्प घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम नेहरु युवा केंद्र समन्वयक निशांत रौतेला, तपस्वी गोंधळी, श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, पोलीस विभागातील कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.