लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत ते समस्त शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष असल्याचे जाहीर केले आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा, असे आव्हान राज्याचे बंदरे, मत्स्यविकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच महिन्यांपासून काम करीत आहेत. तसे काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्यांनी आधी केलेले नाही, असेही भुसे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी ही बैठक होती. यावेळी भुसे यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना पक्षप्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत भुसे यांनी समाचार घेतला. शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी विविध हितकारी निर्णय घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.
‘अडीच वर्षे घरातच’आमदारांनी उठाव केला तेव्हा आम्ही घरातील भांडण मिटावे यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची मानसिकता आमदार यांच्या बाजूने बदलत होती. मात्र संजय राऊत, भास्कर जाधव यायचे आणि ठाकरे यांचे विचार बदलत होते. अडीच वर्ष घरात बसून काहीही काम केले नाही. निर्णय घेण्याबाबत आम्ही उद्धव यांना सांगत होतो. मात्र अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असल्याने आमची अडचण झाली, असे भुसे म्हणाले.