तरुणाने शेतीतून निर्माण केला स्वयंरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:54 AM2020-03-06T00:54:39+5:302020-03-06T00:54:47+5:30
भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बेलवाडीतील तेजस गावणकर या युवकाने आपल्या शेतात फळभाजी लागवड करून रोजगार मिळवला आहे.
बोर्ली-मांडला : शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बेलवाडीतील तेजस गावणकर या युवकाने आपल्या शेतात फळभाजी लागवड करून रोजगार मिळवला आहे. कारली लागवडीतून त्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
दुर्गम भागात राहून तेजसने बारावी कॉमर्स शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता, आपल्या बेलवाडी येथील शेतातील दहा गुंठे जागेत कारली लावली. तर पाच गुंठे जागेमध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीर व पांढरा कांदा आदी भाज्यांची लागवड केली. त्याने साधारण डिसेंबरमध्ये लागवड केली होती. दीड महिन्यानंतर कारल्याचे पीक चांगले येऊन आठवड्यातून ७० ते ८० किलो उत्पादन मिळू लागले. आज मेथी, कारली व भाजी लागवडीतून त्याला हजारो रुपयांचा स्वयंरोजगार मिळाला आहे. यासाठी त्यांनी शेतात सेंद्रिय खतांचा वापर केला. यशस्वी फळभाजी लागवड करण्यात तेजसला आपल्या आईवडिलांचे उत्तम मार्गदर्शन व साथ मिळाली आहे.
>शिक्षण घेऊन पदवीधर होऊन युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध शेतात आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय खतांचा वापर करून भाजीपाला लागवड करून स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी व्हावे.
- तेजस गावणकर