लोकमत न्यूज नेटवर्करायगड : इतिहासातील शौर्याची साक्ष देणाऱ्या अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी ढासळत आहेत. याची दुरुस्ती केली नाही, तर तटबंदी आणि बुरुज पूर्णत: नष्ट होणार आहेत. याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अलिबाग येथील तरुणांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अलिबागच्या वैभवशाली परंपरेत कुलाबा किल्ल्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. अरबी समद्रात असणारा हा किल्ला मिश्रदुर्ग श्रेणीतील किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड-किल्ले जिंकले. त्यानंतर, त्यांची डागडुजी करून घेतली होती. सरखले कान्होजी राजे आंग्रे यांच्याकडे या किल्याची धुरा होती. शेकडो वर्ष झाली तरी शौर्याची साक्ष देत आजही ताठ मानेने हा किल्ला उभा आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याचे बुरुज आणि काही तटबंदी ढासळत आहेत. आतापर्यंत विविध शिवप्रेमींनी किल्ल्याची डागडुजी करावी, यासाठी आवाज उठवला होता. मात्र, हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने विशेष लक्ष दिले गेले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
कुलाबा किल्ल्यावरील पश्चिमेकडील तटबंदी आणि पूर्वेकडील बुरुज ढासळले आहेत. वेळीच डागडुजी केली गेली नाही, तर अखंड तटबंदी आणि बुरुज नामेशष होण्याची भीती शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. ढासळलेल्या तटबंदी आणि बुरुज तातडीने दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी अलिबागमधील तरुण मावळे सरसावले आहेत. किशोर अनुभवने, यतिराज पाटील, आकाश राणे, वैभव भालकर, ऋषिकेश चिंदरकर या तरुण मावळ्यांनी थेट केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे दाद मागीतली आहे. या तक्रारीची खासदार तटकरे यांनी तातडीने दखल घेत, संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती किशोर अनुभवने यांनी ‘लोकमत’ला दिली.
कुलाबा किल्ल्याची तातडीने दुरुस्ती केली नाही, तर जन आंदोलन उभे करू, असा इशाराही या तरुण मावळ्यांनी दिला आहे. १९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नवी दिल्लीचे संचालक आणि भारतीय पुरातत्त्व मुंबईचे अधीक्षक यांना केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.शिवाजी महाराजाच्या शौर्याचे प्रतीक हे गड-किल्ले आहेत. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत पुढील आठवड्यात पुरातत्त्व विभागाचे संचालक यांच्यासोबत बैठक घेणार आहे. संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे कोविड पॉझिटिव्ह असल्याने, त्यांची तब्बेत ठीक झाल्यावरच त्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल.- सुनील तटकरे, खासदार, रायगड