तरुणांनी शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण अभ्यासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:38 AM2018-02-20T01:38:25+5:302018-02-20T01:38:43+5:30
व्हिएतनामसारख्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सखोल अभ्यास करून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला जेरीस आणले.
अलिबाग : व्हिएतनामसारख्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सखोल अभ्यास करून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला जेरीस आणले. नियोजन, शत्रूच्या शक्तीचा अचूक अभ्यास व मानसिक दबावतंत्र या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या शिवरायांच्या युद्धनीतीचा तरुणांनी अभ्यास करावा, असे आवाहन गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवव्याख्याते सचिन करडे यांनी केले.
पोलादपूरच्या शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर बुटाला, कार्यालय अधीक्षक मुकुंद पंदेरकर, विद्यार्थी प्रतिनिधी मेघश्याम चव्हाण आदी उपस्थित होते. इतिहास विभागप्रमुख प्रा.प्रभाकर गावंड यांनी प्रास्ताविक केले.
उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ पोलादपूर येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून तसेच शिवआरती व ढोल-ताशा पथकाच्या मानवंदनेने करण्यात आला. व्याख्यानाच्या कार्यक्रमापूर्वी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
करडे यांनी शिवरायांच्या युद्धनीतीबद्दल विवेचन करताना, सह्याद्रीच्या कडीकपारीची भौगोलिक रचना लक्षात घेऊन सहजपणे वापर करता येईल अशा घोडदळाच्या विकासावर शिवाजी महाराजांनी भर दिला. साधने व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे गनिमी काव्याचे अनोखे युद्धतंत्र शिवरायांनी विकसित केल्याचे सांगून करडे यांनी युद्धाचे व रणक्षेत्राचे प्रकार याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
प्रा.डॉ. राम बरकुले यांनी शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक दृष्टी, गुणग्राहकता व वैज्ञानिक दृष्टिकोन याचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.