बाप्पा आले, पैसाही आला; गणेशोत्सावता रंगकामातून मिळतोय तरुणांना रोजगार
By निखिल म्हात्रे | Published: September 12, 2023 08:19 PM2023-09-12T20:19:38+5:302023-09-12T20:20:38+5:30
वेगवेगळ्या आकाराच्या रंगाची आरास बाजारात दाखल झाल्याने त्या खरेदी करण्याची ओढही वाढू लागली आहे.
अलिबाग - गणपती बाप्पा पाहुणा म्हणून घरी येणार असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी घराची रंगरंगोटी करण्याची कामे सध्या सुरु आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही रंगकामाची लगबग दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील असंख्य तरुणांच्या हाताला काम मिळाले असून, त्यांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. गणरायाचे आगमन येत्या 19 सप्टेंबर रोजी घरोघरी होणार आहे. गणरायाच्या स्वागताबरोबरच आरस सजावटीची तयारी गावागावात सुरु झाली आहे.
वेगवेगळ्या आकाराच्या रंगाची आरास बाजारात दाखल झाल्याने त्या खरेदी करण्याची ओढही वाढू लागली आहे. गणरायाचे स्वागत धूमधडाक्यात व्हावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून अनेक ठिकाणी घरे रंगविण्याचे काम सुरु झाले आहे. गावातील घराघरात रंगकाम करण्याची लगबग सुुरू झाली आहे. शहरी भागातदेखील घरांसह इमारतींनादेखील रंगविण्याची कामे वेगाने सुरु झाले आहे. पूर्वी रंगकाम करण्यासाठी बाहेरून कामगार बोलवावे लागत. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील गावागावात रंगकाम करणारे तरुण तयार झाले आहेत. पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत दिवसाची मजुरी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. गावागावात तरुणांचा पाच ते सहा जणांचा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून रंगकाम करण्याचे काम घेतले जात आहे. यातून चांगला रोजगार मिळत असल्याने बेरोजगारीचा प्रश्नही सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
पूर्वी गणेशोत्सवात रंगकाम करण्यासाठी कामगार मिळत नसत. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, गावागावातून तरुण या कामासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच कामेही वेळेवर होत आहेत.
- जयंत वार्डे, ग्रामस्थ.
गणपतीच्या सिजनमध्ये रंगकामातून तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. गावातील काही तरुण एकत्र येऊन घरे रंगविण्याचे काम घेतो. यातून आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
- अमर लोंढे, रंगकाम करणारा.