तरुणांनी आदिवासीवाडीवर साजरी केली दिवाळी; फराळाचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 10:51 PM2019-10-27T22:51:58+5:302019-10-27T22:52:13+5:30
कार्लेतील आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हसू
दिघी : जिथे अन्य लोक फटाक्यांच्या धुरामध्ये पैशांचा दुरुपयोग करून पर्यावरणाची हानी करत आहेत. दिवाळी सण म्हटले की, मध्यमवर्गीय कुटुंब आपले पैशाचे गणित जुळवून सण साजरे करतात; पण या सर्व धामधुमीत आपल्या जवळचा आदिवासी समाज मात्र गरिबीमुळे उपेक्षित राहतो. त्यांनाही मनात जाणवत असणार की, आपणही इतरांप्रमाणे हा दिवाळी सण गोड पदार्थ करून साजरा करावा. याच जाणिवेतून युवा एकता प्रतिष्ठानमधील तरुणांनी या वेळची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली. या वेळी कार्ले आदिवासीवाडी येथे फराळ वाटप करण्यात आले.
आपणही या समाजाचे देणेकरी लागतो, या भावनेतून गावातील नागरिकांना एकत्र घेऊन या आदिवासी समाजासाठी फराळवाटपाचा संकल्प केला व यासाठी प्रतिष्ठानमधील अनेक सदस्यांनी पुढाकार घेत आपआपल्या घरातून फराळ एकत्र करून कार्ले येथील आदिवासीवाडीमध्ये याचे वाटप करण्यात आले. कार्ले आदिवासी वाडीवरील समाज अतिशय गरीब व होतकरू आहे. दिवसा कामाला जायचे व दिवसभर काम करून जो मोबदला मिळतो त्यावर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा. साधारण ५० ते ६० घरांमध्ये जाऊन या फराळाचे वाटप करून तेथील लहान मुलांसोबत त्यांच्या आनंदात या सर्व युवकांनी सहभाग घेत भविष्यात या समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला. यामध्ये या समाजाकरिता ज्या शासनाच्या योजना असतात त्यांचा लाभ त्यांना मिळवून देणार.
तसेच त्यांचे आरोग्य, तिथल्या मुलांचे शिक्षण तसेच इतर अनेक समाजोपयोगी काम हाती घेऊन लवकरच इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणले जाईल, अशी खात्री देत त्यांनी या गावातून निरोप घेतला.
वनवासी पाड्यावर मिठाईचे वाटप
मुरुड : आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दिवाळी सण साजरा करणे गोरगरिबांना शक्य होत नाही. कष्टकरी वनवासी मंडळी सणाला गोडधोड करू शकत नाहीत. आपल्याच बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही विहिंपतर्फे फराळ वाटप करण्यात आले. टक्याच्या आदिवासीवाडीवर विश्व हिंदू परिषदेतर्फे ४६ कुटुंबीयांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी विहिंपचे मुरुड तालुका प्रखंड प्रमुख दिलीप दांडेकर, सुनील विरकुड, राजाराम ठाकूर आदी उपस्थित होते.